‘छत्रपती’साठी ८० टक्के मतदान
By admin | Published: April 25, 2015 10:56 PM2015-04-25T22:56:45+5:302015-04-25T22:56:45+5:30
येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २५) सरासरी ८० टक्के मतदान झाले,
बारामती : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २५) सरासरी ८० टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी दिली. उशिरापर्यंत मतदानाची आकडेवारी घेण्याचे काम सुरू होते. या दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही. दुपारी ४ नंतर मतदानासाठी गर्दी झाल्याचे चित्र होते.
सकाळी सात वाजता मतदानास सुरूवात झाली. ढेकळवाडी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार, आशादेवी पवार आदींनी मतदान केले. तर आमदार दत्तात्रय भरणे यांनी अंथुर्णे येथील मतदान केंद्रावर मतदान केले. शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांनी लासुर्णे येथे मतदान केले. सकाळी आठच्या सुमारास मतदारांची तुरळक गर्दी होती. मोठ्या प्रमाणात मतदार मतदान केंद्रावर दाखल झाले होते. मात्र, दुपारच्या सुमारास उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदानाचा वेग मंदावला होता. एका मतदाराला दहा मतपत्रिकांवर शिक्का मारावा लागत असल्याने वेळ लागत होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण २१ हजार ४७५ सभासद या कारखान्याचे मतदार आहेत. त्यापैकी १७ हजार ८७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुरुवातीपासूनच विरोधकांमध्ये एकमत नसल्याने चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागांसाठी मतदान होत आहे. त्याचबरोबर निवडणुकीत चुरसदेखील नसल्याचे चित्र आहे. मतमोजणी सोमवारी (दि. २७ एप्रिल रोजी) बारामती एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे.
दरम्यान मतदान करण्यासाठी वापरण्यात येणारे रबरी शिक्के पुसटसे उमटत असल्याची काही ठिकाणी तक्र ार होती. या शिक्क्यांवरील प्लॅस्टिक कागद न काढल्याने काही ठिकाणी ही किरकोळ समस्या निर्माण झाली होती.
४डोर्लेवाडी : डोर्लेवाडी, झारगडवाडी, सोनगाव, ढेकळवाडी, पिंपळी, लिमटेक या गावांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले. झारगडवाडीमध्ये एकूण ८३.५५ टक्के, डोर्लेवाडीमध्ये ७८ टक्के, तर सोनगावमध्ये ७९.५५ टक्के, ढेकळवाडी ८१.७० टक्के, पिंपळी ८२ टक्के, लिमटेक ८०.५४ टक्के, काटेवाडीत ८४ टक्के मतदान झाले.
४कळंब : कळंबमध्ये सभासद संख्या ३२९ इतकी आहे. यामुळे प्रथमच कळंबमध्ये मतदान केंद्र सभासदांच्या सोयीसाठी ठेवण्यात आले होते. मतदानास सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली. सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. कळंब येथे ८१.४५ टक्के मतदान झाले.