लोणावळा नगरपरिषदेची ८० टक्के मालमत्ता कर वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 02:37 PM2019-04-01T14:37:12+5:302019-04-01T15:01:57+5:30
नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मोहिमेद्वारे मिळकत कर भरण्याकरिता नागरिकांना घरोघरी जाऊन आवाहन केले होते.
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेची २०१८-१९ यावर्षात सुमारे ८० टक्के मालमत्ता कर वसुली झाली आहे. लोणावळा नगरपरिषद हद्दीत १८ हजार २३० मिळकती आहेत. या मिळकतीमधून २४ कोटी ३० लाख रुपयांपैकी २१ कोटी ६ लाख २४ हजार ८४४ रुपये कर रुपाने वसुल करण्यात आला. वसुल रक्कमेत थकबाकी धारकांकडून अडीच कोटी रुपये व्याज वसुल करण्यात आले आहे. कर भरणा करण्याकरिता ३० व ३१ मार्च रोजी कार्यालय खुले ठेवण्यात आली होती अशी माहिती मुख्याधिकारी सचिन पवार व कर निरीक्षक शिवाजी मेमाणे यांनी दिली.
नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मोहिमेद्वारे मिळकत कर भरण्याकरिता नागरिकांना घरोघरी जाऊन आवाहन केले होते. नागरिकांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ही वसुली झाली. कर न भरणाऱ्या १३ मिळकतींना सिल मारण्यात आले होते त्यापैकी 9 जणांनी कराचा भरणा केला आहे. लोणावळा व खंडाळा भागात मोठ्या प्रमाणात सेकंड होम आहेत. अनेक मिळकती ह्या बंदच असतात, त्यांचे मालक मुंबई, पुण्यासह विविध राज्यात किंवा परदेशात असल्याने शंभर टक्के कर वसुली होत नसली तरी नगरपरिषदेच्या मिळकत कर विभागाने चांगली कामगिरी केली आहे.