पुणे विभागात ८० हजार ५९१ जणांची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:06+5:302021-03-17T04:11:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात महावितरणची वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई रोखण्यात आली होती. मात्र, ...

80 thousand 591 people lost power in Pune division | पुणे विभागात ८० हजार ५९१ जणांची वीज तोडली

पुणे विभागात ८० हजार ५९१ जणांची वीज तोडली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात महावितरणची वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई रोखण्यात आली होती. मात्र, अधिवेशन संपताच वीज तोडण्याच्या कारवाईला वेग आला आहे. गेल्या पाच दिवसांतच पश्चिम महाराष्ट्रातल्या ८० हजार ५९१ थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. वीज बिलाची थकीत रक्कम न भरता आजूबाजूच्या मीटरमधून किंवा अन्य प्रकारे परस्पर वीजपुरवठा घेतल्यास वीजचोरीचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई केली जात असल्याचे महावितरणने कळवले आहे.

पुणे जिल्ह्यातल्या सर्वाधिक ५४ हजार ३४ ग्राहकांची वीज तोडण्यात आली आहे. त्या खालोखाल सातारा जिल्ह्यातल्या ९ हजार ७३६, तर सोलापूर जिल्ह्यातील ८ हजार १३८ ग्राहकांची वीज तोडण्यात आली. सांगलीतल्या ४ हजार ३४२ आणि कोल्हापुरातील ४ हजार ३४१ ग्राहकांचीही वीज तोडली गेली.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील चार लाख घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी गेल्या महिन्याभरात ४७९ कोटी ६४ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. मात्र अद्यापही याच वर्गवारीतील तब्बल २३ लाख ७० हजार ७०० ग्राहकांकडे १३८४ कोटी ५७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु राहणार आहे. थकबाकी भरून सहकार्य करावे असे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.

फेब्रुवारीतल्या १५ तारखेपर्यंत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात १८६४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी होती. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणने मोहीम हाती घेतली आहे. त्यास प्रतिसाद देत १५ मार्चपर्यंत चार लाख एक हजार सातशे थकबाकीदारांनी ४७९ कोटी ६४ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला. यात सर्वाधिक ३ लाख ५२ हजार ३८० घरगुती ग्राहकांनी ३०३ कोटी ३७ लाख, ४१ हजार ६२० वाणिज्यिक ग्राहकांनी १२० कोटी ४० लाख तर ७६६० औद्योगिक ग्राहकांनी ५५ कोटी ५६ लाखांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

चौकट

अशी आहे थकबाकी

जिल्हा थकबाकीदार रक्कम

पुणे १०,७५,६२६ ७३८ कोटी १३ लाख

सातारा २,१३,२८५ ७५ कोटी ३३ लाख

सोलापूर ३,४०,२१८ १७८ कोटी ६५ लाख

सांगली २,७९,३४० १३६ कोटी ४७ लाख

कोल्हापूर ४,६२,२२५ २५५ कोटी ९६ लाख

Web Title: 80 thousand 591 people lost power in Pune division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.