८० वर्षाच्या वृद्धेसह केअर टेकरचे हातपाय बांधून सव्वा चार लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:11+5:302021-03-05T04:12:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सुरा, काठ्या घेऊन बंगल्यात जबरदस्तीने घुसून चौघा चोरट्यांनी ८० वर्षाच्या महिलेसह केअर टेकरचे हात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सुरा, काठ्या घेऊन बंगल्यात जबरदस्तीने घुसून चौघा चोरट्यांनी ८० वर्षाच्या महिलेसह केअर टेकरचे हात पाय बांधून घरातील रोकड, सोन्याचे दागिने असा सव्वा चार लाखांचा ऐवज चोरुन नेला. हा धक्कादायक प्रकार पाषाण येथील पंचवटी सोसायटी परिसरातील वृंदावन सोसायटीत बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला. या प्रकरणी ८० वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पाषाण टेकडीच्या एका बाजूला पंचवटी सोसायटी असून फिर्यादी यांचा मध्ये बंगला आहे. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहे. मुलगा अमेरिकेत असून एक मुलगी उस्मानाबाद येथे रहात आहेत. फिर्यादी यांचे पती ८८ वर्षाचे आहेत. त्यांच्या पतीला अर्धांगवायू झाला आहे. मागील ३ वर्षापासून त्यांनी घरात एक केअर टेकर ठेवला आहे. बुधवारी तिघेही घरात असताना साडेसात ते पावणे आठ वाजण्याच्या सुमारास चार चोरटे त्यांच्या घरात शिरले. त्यांच्या हातात कोयता, सुरी आणि काठी सारखी हत्यारे होती. त्यांनी घरात शिरताच केअरटेकरच्या पायावर काठीने व कोयत्याने मारून त्याला जखमी केले. त्याचे हात व तोंड कापडाने बांधुन घरातील सर्व साहित्य चोरीच्या इराद्याने विस्कटले. किंमती साहित्य शोधुन, फिर्यादी यांना माल कोठे ठेवला आहे, असे म्हणून पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटाचे दरवाजे उचकटून चोरट्यांनी २५ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा सव्वाचार लाखांचा ऐवज चोरून नेला. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष कोळी करत आहेत.