टीईटी परीक्षेस राज्यात ८ हजार ‘डुप्लिकेट’ परीक्षार्थी, परीक्षेस ९० टक्के परीक्षार्थींची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:17 AM2021-11-22T11:17:01+5:302021-11-22T11:17:37+5:30
परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा २०१३ पासून घेतली जात असून २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सातवी टीईटी परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे मागील वर्षी टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यामुळे यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या वाढली.
पुणे : राज्याच्या परीक्षा परिषदेतर्फे रविवारी घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) काही अपवाद वगळता सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या परीक्षार्थींपैकी तब्बल ८८ ते ९० टक्के परीक्षार्थी उपस्थित होते. या परीक्षेत ८ हजार डुप्लिकेट परीक्षार्थींनी नोंदणी केल्याचे समोर आले. परीक्षेच्या पहिल्या सत्रात कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद व धुळे जिल्ह्यांत काही ठिकाणी परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचलेल्या परीक्षार्थींनी गोंधळ घातला.
परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा २०१३ पासून घेतली जात असून २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सातवी टीईटी परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे मागील वर्षी टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यामुळे यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या वाढली. यापूर्वी १९ जानेवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेस ३ लाख ४३ हजार २८४ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती, तर २१ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या परीक्षेसाठी ४ लाख ६८ हजार ९४८ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती.
‘डुप्लिकेट’ कोणते?
टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्यांमध्ये काहींनी दोन ते तीन वेळा ऑनलाइन अर्ज भरला होता, त्यांचा केवळ एकच अर्ज गृहीत धरण्यात आला. एकापेक्षा जास्त वेळा अर्ज भरणाऱ्या या ‘डुप्लिकेट’ परीक्षार्थींची संख्या तब्बल आठ हजार होती.
राज्यातील १ हजार ४४३ परीक्षा केंद्रांवर पेपर क्रमांक १ साठी राज्यातील २ लाख ५४ हजार ४२८ परीक्षार्थींच्या, तर पेपर क्रमांक २ साठी २ लाख १४ हजार २५० परीक्षार्थींच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.
- दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, परीक्षा परिषद