भारतीय चित्रपटसृष्टीचा ८००० मिनिटांचा मौखिक इतिहास रसिकांसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:09 AM2021-05-01T04:09:06+5:302021-05-01T04:09:06+5:30
पुणे : मूकपटाच्या जमान्यापासून ते अलीकडील काळापर्यंतच्या चित्रपटसृष्टीतील असंख्य मान्यवर अभिनेते, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, स्टुडिओ-मालक यांचा अद्भुत प्रवास रसिकांना ...
पुणे : मूकपटाच्या जमान्यापासून ते अलीकडील काळापर्यंतच्या चित्रपटसृष्टीतील असंख्य मान्यवर अभिनेते, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, स्टुडिओ-मालक यांचा अद्भुत प्रवास रसिकांना ऐकायला मिळणार आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १५१ व्या जयंतीचे निमित्त साधून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या मौखिक इतिहासाचा फार मोठा खजिना चित्रपट रसिकांसाठी खुला केला आहे. या मौखिक इतिहास प्रकल्पाअंतर्गत संग्रहालयाच्या संशोधन कार्यक्रमानुसार प्रामुख्याने १९८० मध्ये या मान्यवर कलावंतांच्या मुलाखती ध्वनिमुद्रित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्या जीवनात आलेले विविध अनुभव, अनेक अकल्पित घटना आणि चित्रपट-जगतातील रोमहर्षक प्रसंग आदी अनुभवता येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांच्या घेतलेल्या मुलाखती हे या मौखिक इतिहास प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुमारे आठ हजार मिनिटांच्या या ध्वनिचित्रफितीमध्ये एकूण ५३ कलावंतांच्या मुलाखतींचा समावेश आहे. मराठीमध्ये एकूण २६ मुलाखती असून तमिळमध्ये १०, इंग्रजीमध्ये १२, तेलुगूमध्ये ३ तर बंगाली भाषेत २ मुलाखती ऐकायला मिळतील. भारताची पहिली बालकलाकार म्हणून नावाजलेली दादासाहेब फाळके यांची कन्या मंदाकिनी फाळके-आठवले यांनी आपल्या मुलाखतीमध्ये कालियामर्दन (१९१९) या मूकपटात बालकृष्णाचे काम कशा पद्धतीने केले त्या आठवणींना उजाळा दिला आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या https://nfai.gov.in/audio_interview.php या संकेतस्थळावर मुलाखती ऐकता येतील, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली.
----------------------------------------