८ हजार पोलीस, १ हजार बस, ११० एकरवर पार्किंग, शौर्यदिनासाठी जय्यत तयारी
By नितीन चौधरी | Published: December 22, 2023 07:37 PM2023-12-22T19:37:31+5:302023-12-22T19:38:59+5:30
शौर्य दिनासाठी सुमारे २० लाखांहून अधिक अनुयायी येणार असल्याने त्या दृष्टीने नियोजन
पुणे : कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या शौर्य दिनासाठी सुमारे २० लाखांहून अधिक अनुयायी येणार असल्याने त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. त्यासाठी ८ हजार पोलिस कर्मचारी, अडीचशेहून अधिक वैद्यकीय कर्मचारी तसेच ११० एकरवर दोन्ही बाजुंनी ३६ ठिकाणी वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. तसेच ३१ डिसेंबर व एक जानेवारी रोजी पीएमपीच्या एकूण १ हजार ५० बस गाड्या उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
शौर्य दिनाच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, पीएमपीचे महाव्यवस्थापक संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
११० एकरवर पार्किंग
देशमुख म्हणाले, “जिल्हा प्रशासन गेल्या तीन महिन्यांपासून शौर्य दिनाच्या तयारीसाठी नियोजन करत आहे. यात सार्वजनिक बांधकाम, पोलिस तसेच जिल्हा परिषदेचे सहकार्य घेण्यात येत आहे. यंदा अनुयायांची संख्या १५ ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असल्याने त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी सुमारे १६ लाख अनुयायी आले होते. त्यानुसार ६० एकरवर १७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा त्यात सुमारे ४० एकरने वाढ करून दोन्ही बाजूला ११० एकरवर ३४ वाहनतळ उभारले जाणार आहेत.”
१५० टँकर वाढवले
यंदा पाण्याचे टँकरदेखील वाढवण्यात आले असून ही संख्या १५० ने वाढली आहे. या ठिकाणी सुमारे २ हजार शौचालयेदेखील उभारण्यात आले असून सक्शन मशिनदेखील ठेवण्यात येणार आहेत. वैद्यकीय विभागाचे सुमारे २५९ अधिकारी व कर्मचारी दोन्ही दिवशी वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत १०८ क्रमांकाच्या २० तर अन्य ३० अशा एकूण ५० रुग्णवाहिका या ठिकाणी तैनात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
पीएमपीच्या १ हजार ५० बस
पीएमपीकडून ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी सुमारे १ हजार ५० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ डिसेंबरला ४७५ बस दोन शिफ्टमध्ये चालवल्या जातील. तर १ जानेवारीला ५७५ बस दोन्ही बाजुंना चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांसाठी शिक्रापूर येथील पार्किंगच्या ठिकाणी ३१ डिसेंबरला १ हजार ३०० वाहक तर १ जानेवारीला १ हजार ५०० वाहक, चालक तैनात असतील. तर पेरणे पार्किंगला ३१ डिसेंबरला ११०० तसेच १ जानेवारीला १३०० वाहक चालक दोन शिफ्टमध्ये काम करतील, असेही ते म्हणाले. या सोहळ्यासाठी एनडीआरएफचे एक पथकही नेमण्यात आले आहे. तसेच जिल्हा व शहर पोलिसांचे सुमारे ८ हजार कर्मचारी व अधिकारी या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळतील.
प्रशासनाच्या नियोजनावर समाधानी : राहुल डंबाळे
शौर्यदिन सोहळ्यानिमित्त विविध आंबेडकरी संघटना व कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीने वेळोवेळी केलेल्या सुचनांचा अंतर्भाव या नियोजनात आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे अध्यक्षतेखालील प्रशासकीय समितीने केलेले नियोजन समाधानकारक असल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे म्हणाले. दरम्यान, हा उत्सवव बार्टीच्या निधीतून न करता जिल्हा परिषद अथवा जिल्हाधिकारी यांच्या निधीमधून करावा, अशी एकमुखी मागणी बैठकीतील अनुयायांनी केली.