छायाचित्र न दिल्याने ८० हजार मतदारांची नावे मतदारयादीतून ‘कट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:16 AM2021-08-18T04:16:12+5:302021-08-18T04:16:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन शंभर टक्के छायाचित्रयुक्त मतदारयादी तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन शंभर टक्के छायाचित्रयुक्त मतदारयादी तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु पुणे जिल्ह्यात अद्यापही तब्बल ३ लाख १३ हजार ९३९ मतदारांचे यादीत छायाचित्र नाही. मतदारांना वारंवार सांगून देखील छायाचित्र न दिलेल्या ८० हजार ३१५ मतदारांची नावे अखेर मतदारयादीतून वगळण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्ययावत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. आयोगाने शंभर टक्के छायाचित्रयुक्त मतदारयादी तयार करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. पुणे जिल्ह्यात ७८ लाख ८७ हजार ८७४ एकूण मतदार आहेत. यापैकी ३ लाख १३ हजार ९३९ मतदारांची यादी छायाचित्र नाही. आयोगाच्या या छायाचित्र शोधमोहिमेनंतर देखील ज्या मतदारांचे छायाचित्र दिली नाही अशा सुमारे ८० हजार ३१४ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यात सर्वाधिक मतदार शहरी भागातील आहेत.
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात मतदारयादी शुध्दीकरण मोहीम भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनांनुसार राबविण्यात येत आहे. त्यानुसार मतदार यादीमध्ये नवीन मतदारांची नोंदणी करणे, मयत, स्थलांतरित दुबार मतदारांची वगळणी करणे, मतदार यादीमध्ये नाव आहे. परंतु फोटो नाही अशा मतदारांचे फोटो मतदारयादीमध्ये समाविष्ट करणे कामकाज सुरु आहे.
--------
जुन्नर, खेड-आळंदी, बारामतीमधून शंभर टक्के छायाचित्र जमा
पुणे जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून छायाचित्र जमा करण्याची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात जुन्नर, खेड, आळंदी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात शंभर टक्के मतदारांची छायाचित्रे जमा झाली आहेत. तर खडकवासला मतदारसंघात सर्वाधिक तब्बल २१ हजार ११२ मतदारांची अद्याप छायाचित्रे जमा झालेली नाहीत.
------
मतदार यादीतून वगळण्यात आलेली संख्या
जुन्नर 309, आंबेगाव 138, खेड-आंळदी 316, शिरूर 1107, दौंड 4247, इंदापूर 154, बारामती 25, पुरंदर 191, भोर 1339, मावळ 886, चिंचवड 1672, पिंपरी 6649, भोसरी 2673, वडगावशेरी 2534, शिवाजीनगर 7814, कोथरूड 2221, खडकवासला 21112, पर्वती 5447, हडपसर 10438, पुणे कॅन्टोन्मेंट 5982, कसबापेठ 5042, एकूण 80341
-----