‘घोडगंगा’साठी ८0.८३ टक्के मतदान

By admin | Published: May 11, 2015 06:04 AM2015-05-11T06:04:15+5:302015-05-11T06:04:15+5:30

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी आज ८0.८३ टक्के मतदान झाले.

80.83 percent vote for 'Ghodganga' | ‘घोडगंगा’साठी ८0.८३ टक्के मतदान

‘घोडगंगा’साठी ८0.८३ टक्के मतदान

Next

शिरूर : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी आज ८0.८३ टक्के मतदान झाले. दुपारपर्यंत ४५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे बहुतांशी मतदान केंद्रांवरचे चित्र होते. उन्हाचा तडाखा कमी झाल्यावर पुन्हा मतदानास वेग आला. दोन्ही पॅनेलने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीचा निकाल १२ मे रोजी लागणार आहे.
आज सकाळी तालुक्यातील ६० मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. एकूण १९ हजार १४३ मतदारांपैकी १९६३ मतदार मयत असून, १७ हजार १८० मतदारांना मतदान करावयाचे असल्याने बूथवर फारसा ताण नव्हता. मात्र मतदान केंद्राबाहेर दोन्ही पॅनेलचे बूथ होते. उन्हापासून संरक्षणासाठी मांडव उभारण्यात आले होते. उन्हाचा तडाखा वाढण्याआधी म्हणजे ११ वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले. यानंतरही तीन वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर तुरळक मतदार दिसून आले. तोपर्यंत ४५ ते ५० टक्के मतदान झाले होते. चारनंतर पुन्हा मतदारांच्या रांगा दिसून आल्या. वेळ सहापर्यंत असल्याने मतदानाचा टक्का ८0.८३ पर्यंत गेला.
दरम्यान, सहकार बचाव, शेतकरी पॅनेलचे प्रमुख आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दुपारी शिरुर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख, माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी वडगाव साराई येथील मतदान केंद्रात सकाळी मतदान केले. या पॅनेलचे आधारस्तंभ माजी आमदार पोपटराव गावडे यांनी टाकळी-हाजी मतदान केंद्रावर मतदान केले. गेले आठवडाभर कोणता पॅनेल बाजी मारेल या चर्चेला उधाण आले आहे. पवार यांच्या अस्तित्वाची लढाई असून, विधानसभेच्या पराभवानंतरही निवडणूक जिंकण्यासाठी जिवाचे रान केल्याचे दिसून आले आहे. पाचर्णे यांनी कारखाना ताब्यात घ्यायचाच, असा निर्धार करून प्रचारादरम्यान आपला झंझावात दाखवून दिला आहे. यामुळे आज मतदानाच्या दिवशीही दोघे मतदान केंद्रावर आढावा घेताना दिसून आले. आमदार पाचर्णेंच्या पत्नी मालती पाचर्णे व माजी आमदार पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यादेखील मतदान केंद्रावर ठाण मांडून बसल्याचे दिसून आले.
कोणत्याही मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण दिसून आले नाही. काही मतदान केंद्रांवर खेळीमेळीचे वातावरणही पाहावयास मिळाले.

Web Title: 80.83 percent vote for 'Ghodganga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.