पुणे-पिंपरी-चिंचवडमधील ८१२ म्हाडाच्या घरांसाठी सोडत जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 12:05 PM2018-11-23T12:05:35+5:302018-11-23T17:09:42+5:30
या सोडतीसाठी येत्या ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे..
पुणे : पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळातर्फे (म्हाडा) पुणे-पिंपरी-चिंचवडमधील ८१२ परवडणाऱ्या घरांसाठी सोडत गुरुवारी (दि. २२) जाहीर झाली. या सोडतीसाठी येत्या ६ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र, प्रकल्पानुसार अॅमेनिटीजची वेगळी किंमत ग्राहकांना भरावी लागणार असल्याने म्हाडाच्या घरांची स्वस्ताई संबंधित प्रकल्पात असलेल्या सोयी-सुविधांवर अवलंबून असणार आहे.
म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परीषदेत सोडतीची माहिती दिली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या भू अभिन्यास धोरणानुसार ४ हजार चौरसमीटरपेक्षा जास्त बांधकाम असलेल्या प्रकल्पांना २० टक्के ज्यादा चटई निर्देशांक क्षेत्र (एफएसआय) वापरण्याची परवानगी दिली जाते. यातील घरे ही अत्यल्प आणि अल्प उत्पन्नगटातील व्यक्तींसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील २४२ आणि पिंपरी -चिंचवडमधील ५७० घरांची सोडत होणार आहे. या घरांचे चटई क्षेत्रफळ ३० ते ६० चौरस मीटर असून, त्यांची किंमत १० लाख ९२ हजार ६०० ते १९ लाख ५६ हजार १३४ रुपयांदरम्यान राहील. वाकड, पुनावळे, पिंपळे-सौदागर, ताथवडे, किवळे रहाटणी, पिंपळे निलख, बोºहाडेवाडी, मोशी, चिखली आणि चोवीसवाडी येथे हे प्रकल्प उभे राहत आहेत.
बुधवारी (दि. २१) दुपारी बारा वाजता या योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली. येत्या ६ डिसेंबर रोजी रात्री बारा पुर्वी या योजनेसाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जातील. बँकेत आरटीजीएस अथवा एनइएफटीद्वारे ७ डिसेंबरपर्यंत, तर ९ डिसेंबरला रात्री बारा पुर्वी आॅनलाईन पैसे भरता येतील. त्यानंतर सदनिकांची सोडत १९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता कौन्सिल हॉलमागील अल्पबचत भवन येथे होईल. सोडतीत नावे आलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावरही माहिती दिली जाईल. सोडतीत नावे आलेल्या उमेदवारांना ५ जानेवारी २०१९ पर्यंत सदनिकेची दहा टक्के रक्कम आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागलील. जे उमेदवार दहा टक्के रकमेचा भरणा करणार नाहीत, अथवा कागदपत्रे अपलोड करणार नाहीत, त्यांना अपात्र घोषित केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी www.loyyery.mhada.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
सोडतीची सर्व प्रक्रिया आॅनलाईन
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज मागविणे, पैसे भरणे या बरोबरच सोडतीत नावे आलेल्या व्यक्तींची कागदपत्रे देखील आॅनलाईन मागविली जाणार आहेत. त्यामुळे म्हाडाच्या सोडतीची सर्व प्रक्रिया आॅनलाईन होणार आहे. अनेकदा नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र, कलाकारांना सास्कृतिक संचालनालयाचे प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्याची तयारी नागरिकांनी आत्तापासूनच करावी असे आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.