मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर दोन वर्षांत १५४ अपघातांत ८२ जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 03:44 PM2021-01-14T15:44:04+5:302021-01-14T15:46:50+5:30
अपघातांची मालिका कधी थांबणार, असा सवाल वाहनचालक, प्रवाशांकडून उपस्थित
नारायण बडगुजर-
पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर प्राणांतिक अपघातांचे प्रकार मोठे आहे. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. या मार्गावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१९ मध्ये ८२ तर २०२० मध्ये ७२ अपघात झाले. त्यात ८२ जणांचा मृत्यू झाला.
द्रुतगती मार्गावर सोमवारी तीन अपघात झाले. एकापाठोपाठ झालेल्या या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षित प्रवासाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. अपघातांची मालिका कधी थांबणार, असा सवाल वाहनचालक, प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. असे असले तरी बहुतांश अपघातांमध्ये मानवी चुका असल्याचे समोर आले आहे.
ओव्हरस्पीडने वाहन चालविणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, अतिवेगात ओव्हरटेक करणे, अचानक लेन कटींग करणे, पहाटे तसेच इतर वेळेसही सुस्तावलेपणा असताना वाहन चालविणे, रस्त्याच्या कडेला वाहन उभे करणे, वाहनांच्या दिशादर्शक दिव्यांचा वापर न करणे, वाहनांना रिफ्लेक्टर नसणे, मद्यपान करून वाहन चालविणे, अशा काही कारणांमुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊन असतानाही द्रुतगती मार्गावर अपघात मोठ्या संख्येने झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाकडून उपाययोजना करण्यावर भर आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. ओव्हरस्पिडिंग वाहनांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी द्रुतगती मार्गावर इंटरसेप्टर वाहनाची व्यवस्था केली आहे. तसेच वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याचा उपक्रम सुरू आहे.
- श्रीकांत डिसले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत द्रुतगती मार्गावर झालेले अपघात
वर्ष अपघातांचा प्रकार
प्राणांतिक गंभीर जखमी किरकोळ जखमी दुखापत न झालेले एकूण अपघात
२०१९ ३६ २९ ११ ६ ८२
२०२० ३८ २८ ४ २ ७२
वर्ष मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी एकूण
२०१९ ३९ ३९ ११ ८९
२०२० ४३ ३९ ५ ८७
-----------------------------