अबब पुरंदरमध्ये एका दिवसात ८३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:12 AM2021-03-26T04:12:13+5:302021-03-26T04:12:13+5:30
-- नीरा : पुण्यापाठोपाठ आता नजीकच्या तालुक्यात देखील कोरोना संक्रमित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. पुरंदर तालुक्यात सासवड व जेजुरी ...
--
नीरा : पुण्यापाठोपाठ आता नजीकच्या तालुक्यात देखील कोरोना संक्रमित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. पुरंदर तालुक्यात सासवड व जेजुरी येथील आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार आज तब्बल ८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.
कोरोना आता तालुक्यातील ग्रामीण भागात वेगाने हातपाय पसरत असून प्रशासकीय यंत्रणा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. आज सासवड येथील शासकीय प्रयोगशाळेत १०२ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली पैकी ५० रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तर जेजुरी येथील शासकीय प्रयोगशाळेत ५९ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आले पैकी ३३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे २१ गावांत आज एकाच दिवशी तब्बल ८३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोना संकटकाळाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच प्रशासकीय विभागांनी अत्यंत काळजी घेत पाऊले उचलली. त्यामुळे पहिल्या काही काळात तालुक्यातील रुग्णांचे प्रमाण जेमतेम होते. मात्र, यावेळी सर्वच आस्थापने व इतर ठिकाणे खुली करण्यात आली आहेत. त्यात नागरिक आता पहिल्यासारखी प्रतिबंधात्मक काळजी घेत नसल्याने प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. सासवड प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४ गावांत ५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
-
चौकट
-
गावानिहाय रुग्णसंख्या अशी
भिवडी ३, माळशिरस २, हरगुडे, सोनोरी, हिवरे, कुंभारवळण, बोपगाव, कोथळे, दौंडज, भिवडी, कोडीत, भिवरी, गराडे प्रत्येकी १. तर जेजुरीमध्ये एकूण ५९ संशयित रुग्णांपैकी ३३ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. जेजुरी २३, कोळविहिरे ३, कोथळे ३, सिंगापूर, धालेवाडी, नाझरे, लोणीकंद प्रत्येकी १. यामुळे कोरोना विषाणूचा प्रदुर्भावापासून वाचण्यासाठी पुन्हा एकदा सतर्कता राखत शासनाच्या नियमावलीचे पालन करण्याची वेळ आली आहे.