यंदाही ८३३ रिक्षांना सीएनजी किटसाठी अनुदान मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 06:25 PM2019-07-10T18:25:47+5:302019-07-10T18:31:08+5:30
शहरातील सुमारे ८३३ रिक्षांना प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
पुणे : शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी महापालिकेकडून प्रोत्सहान देण्यात येते. यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून महापालिकेच्या वतीने सीएनजी किटसाठी अनुदान देण्यात येते. यंदा देखील हे अनुदान देण्यासाठी १ कोटी रुपयांच्या खर्चांस मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामधून शहरातील सुमारे ८३३ रिक्षांना प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत शहराची प्रदुषणाची पातळी झपाट्याने वाढत आहे. या प्रदुषणामध्ये शहरातील वाढती वाहन संख्या कारणीभूत आहे. यामुळेच महापालिकेच्या वतीने शहरातील खाजगी रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रोत्सहान देण्यात येत आहे. गेल्या आठ वर्षात महापालिकेच्या वतीने तब्बल १६ हजार ५३४ परवाने धारक रिक्षांना अनुदान दिले आहे. त्यात यंदा यासाठी एक कोटीची तरतूद उपलब्ध असल्यामुळे यामधून ८३३ रिक्षांना अनुदानाचा लाभ होणार आहे १७ जून २०१७ पासून आरटीओ मार्फत नवीन परमिट खुले केले असल्याने नवीन रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे .या सर्व नवीन रिक्षांमध्ये कंपनीमार्फत फॅक्टरी सीएनजी किट आहे .तसेच १८ जुलै २०१७ पासून सर्व नवीन रिक्षकांना आरटीओ रजिस्ट्रेशन साठी सीएनजी असणे बंधनकारक झाले आहे . त्यामुळे २०१४ पूर्वीच्या आरटीओ रजिस्ट्रेशन असलेल्या रिक्षांना अनुदानासाठी अर्ज करता येणार आहे. सीएनजी किट अनुदान वाटपाच्या अर्ज आॅनलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे. जुन्या रिक्षावर एकदा सीएनजी किटसाठी अनुदान घेतलेल्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे. सीएनजी किटसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर हे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, असे स्थायीचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी सांगितले.
-------
आतापर्यंत देण्यात आलेले अनुदान
वर्ष अर्थिक तरतुद अनुदान मिळालेल्या रिक्षा
२०११ -१२ २ कोटी १६५१
२०१२ -१३ २ कोटी ८७३२
२०१३- १४ २ कोटी १६५०
२०१४ -१५ २ कोटी ५९ लाख २१६४
२०१५ -१६ १ कोटी ४४ लाख ११४०
२०१६- १७ ४२ लाख ५० हजार ३५४
२०१७- १८ २५ लाख २०८
२०१८ -१९ १ कोटी ६२८