मंगलदास बांदल यांच्यासह नातेवाईकांची ८५ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 02:51 PM2024-10-17T14:51:15+5:302024-10-17T14:52:00+5:30
बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती. मात्र, बांदल यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन उमेदवारी रद्द करण्यात आली
पुणे: जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर बुरुंजवाडी, तसेच महंमदवाडी येथील घरांवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी ऑगस्ट २०२४ मध्ये छापे टाकून कागदपत्रे जप्त केली होती. याप्रकरणी बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात ईडीने बांदल यांच्यासह हनुमंत संभाजी खमधरे, सतीश जाधव व त्यांच्या नातेवाईकांच्या पुणे, सोलापूर आणि अहमदनगर येथील ८५ कोटी रुपयांच्या मालमत्ता बुधवारी (दि. १६) जप्त केल्या.
यापूर्वी बांदल यांच्याविरुद्ध प्राप्तीकर विभागाने कारवाई केली होती. बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लाॅड्रिंग) प्रकरणी शिक्रापूर आणि महंमदवाडी येथील निवासस्थानी ईडीने छापे टाकले होते. ईडीकडून बांदल यांच्या निवासस्थानातून कागदपत्रे जप्त केली होती. बांदल यांच्या बंँक खात्यांची माहिती देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यानंतर बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली.
बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती. मात्र, बांदल यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती.