८५ लाख शेतकऱ्यांना दसऱ्यानंतर धनलाभ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 05:51 AM2023-10-22T05:51:28+5:302023-10-22T05:52:00+5:30
‘नमो किसान’ लाभार्थींच्या याद्या आज होणार अंतिम
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनेदेखील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ एप्रिलमध्ये जाहीर केली होती. त्यानुसार ‘पीएम किसान योजने’च्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना ‘नमो किसान योजने’तून पहिला हप्ता गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभार्थींची जिल्हानिहाय संख्या आज (रविवारी) अंतिम केली जाणार असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.
पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे, खात्यांना ‘आधार’ची जोडणी करणे या निकषांची अंमलबजावणी पूर्णपणे करण्यात आली नव्हती. पंधराव्या हप्त्यासाठी हे निकष बंधनकारक आहेत राज्याच्या योजनेसाठीही हे निकष लागू केले आहेत. पीएम किसान योजनेमध्ये चौदाव्या हप्त्यासाठी ८५ लाख ६० हजार ७३ शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून मान्यता दिली होती.
सोमवारी पैसे जमा होणार
राज्यासाठी देखील पीएम किसान पोर्टलसारखेच स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची जबाबदारी ‘महाआयटी’कडे देण्यात आली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रविवारी जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम होतील. राज्य सरकारने पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० कोटी निधी दिला असून, संबंधित बँकांकडे सोमवारी वितरित केला जाणार आहे. शिर्डीत गुरुवारी लाभार्थींना दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित करतील. ‘पीएम-किसान योजने’तील लाभार्थी संख्येच्या तुलनेत नमो किसान योजनेतील लाभार्थींच्या संख्येत फार फरक पडणार नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.