नाझरे धरणातून 85 हजार क्युसेक्सचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 10:11 AM2019-09-26T10:11:37+5:302019-09-26T10:16:17+5:30
नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झाल्यामुळे नाझरे धरणातून 85 हजार क्युसेक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.
बाळासाहेब काळे, पुरंदर
जेजुरी - नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झाल्यामुळे नाझरे धरणातून 85 हजार क्युसेक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे कऱ्हा नदीच्या लगतची सर्व गावे व बारामती शहरात नदीलगत सर्व ठिकाणी रेड अलर्ट देण्यात येत आहे . सर्व नागरिकांनी व प्रशासकीय यंत्रणांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहावे. तरी सर्व प्रशासकीय यंत्रणाना याद्वारे रेड अलर्ट देण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने संपूर्ण नाझरे गावातील नदीकाठच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. नाझरे जलाशयातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. जलाशयातील विसर्ग आता कमी करण्यात आला आहे. धरणाची साठवण क्षमता आणि नदी पात्रातून येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरण फुटू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने अशी अनुचित घटना घडली नाही.
पुरंदर तालुक्यामध्ये मध्यरात्री झालेल्या ढगफुटीचा फटका बारामती तालुक्याला बसला. पुरंधर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीला 50 वर्षात प्रथमच महापूर आला आहे. पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या अनेक कुटुंबांना वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. तसेच हजारो विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत. तालुक्यातील 15 हजार, बारामतीच्या 7 हजार 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
कऱ्हा नदीकाठी असणाऱ्या आंबी बु, आंबी खुर्द, मोरगाव, तरडोली, माळवाडी, बाबुर्डी, जळगावकडे पठार, जळगाव सुपे आदी गावांमधील नदीकाठच्या नागरीकांना हलविण्यात आले आहे. पुरंदरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री दीड वाजता पाण्याचा मोठा विसर्ग नाझरे धरणातून सुरू करण्यात आला. तत्पूर्वी प्रशासनाने रिक्षातून भोंगा लावून पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील यांनी नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या. रात्रीपासूनच मोरगावच्या मुख्य चौकातून सुपेकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. नदीकाठची घरे पाण्याखाली गेली आहेत. अनेक नागरिकांनी स्वतः हून स्थलांतर केले.