८५ वर्षांचे वाडिया म्हणतात...‘लस घेतली, ऑल गुड, एन्जॉय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:18+5:302021-01-17T04:10:18+5:30
पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील सर्वात ज्येष्ठ व तज्ञ न्यूरो फिजिशियन आर.एस. वाडिया यांना वयाच्या ८५व्या वर्षी ...
पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील सर्वात ज्येष्ठ व तज्ञ न्यूरो फिजिशियन आर.एस. वाडिया यांना वयाच्या ८५व्या वर्षी कोरोना लस टोचण्यात आली. त्यानंतर, त्यांनी ‘ऑल गुड, एन्जॉय’ अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’ला देत आनंद व्यक्त केला.
रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला शनिवारी (दि. १६) सुरुवात झाली. शंभर कर्मचाऱ्यांच्या निवडलेल्या यादीत डॉ. वाडिया यांचेही नाव होते. लसीकरण मोहिमेचे स्वागत करत स्वखुशीने ते लसीकरणास तयार झाले.
वाडिया हे रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरो फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. सर्वात ज्येष्ठ कर्मचारी असल्याने, त्यांना लस टोचताना इतर कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. “डॉ.वाडिया येथील सर्वच कर्मचाऱ्यांचे गुरू आहेत. गुरूंनी लस टोचून घेतली आहे, तर शिष्यांनाही लस टोचून घेण्याची उत्सुकता आहे,” अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
लस घेतल्याचे समाधान व्यक्त करत अभिमान वाटतो, असे डॉ.वाडिया म्हणाले. त्यांनी सांगितले की, सर्व घटकांतील व्यक्तींनी लस घेतलीच पाहिजे. लस घेतल्यानंतर कोणताही त्रास झाला नाही. देशाचा, तसेच रुग्णालयाचा अभिमान वाटतो.
लस घेतल्यानंतर डॉ.वाडिया अगदी सहजपणे निरीक्षण कक्षात येऊन बसले. लस टोचून घेतल्यावर आता मी फक्त ज्यूसचा आनंद घेतोय, असे सांगत तुम्हीही लस टोचून घ्या, असे ते म्हणाले. लसीकरणानंतर त्यांनी सहकाऱ्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या. ‘मी लस घेतली, ऑल गुड, एन्जॉय,’ असे ते वारंवार सर्वांना सांगत होते.