करावं तेवढं कौतुक कमीच!आजीबाईंच्या बटव्यामधून कोरोनाविरुद्धच्या संघर्षासाठी १ लाख १ हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 05:37 PM2020-04-03T17:37:49+5:302020-04-03T17:42:24+5:30
रामनवमी उत्सवाला फाटा देत वर्षभराच्या पेन्शनमधून जमा होणारे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे मोठे संकट महाराष्ट्रासमोर उभे राहिले आहे. त्यातून मार्ग काढत शासनासोबत लढा देण्याकरीता पुण्यातील आजींनी पुढाकार घेतला. वर्षभराच्या पेन्शनमधून जमा होणारे पैसे श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी व सामाजिक संस्थांना सन्मानित करण्यासाठी त्या गेल्या २५ वर्षे वापरत होत्या. मात्र, यंदा हे १ लाख १ हजार रुपये त्यांनी कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढयाला दिले आहेत.
पार्वती चव्हाण असे या आजींचे नाव होय. स्वत:च्या सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या अनेक वर्षे कसबा पेठेत श्रीरामनवमी उत्सव साजरा करत होत्या. श्रीरामनवमीनिमित्त महाभंडारा देखील केला जात असे. शेकडो भक्त या महाप्रसादाचा लाभ घेत. मात्र, ही परंपरा यंदा खंडित झाली तरीही कोरोनाविरुद्धच्या लढयाला त्यांनी ही मदत दिली आहे.
पार्वती चव्हाण १९९४ साली पुणे मनपा शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या. त्यावेळी त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देखील मिळाला होता. त्या आता ८५ वर्षाच्या असून गेली २५ वर्षे स्वत:ला मिळणाऱ्या पेन्शनमधून रामनवमी उत्सव साजरा करतात. त्या म्हणाल्या की, दरवर्षी कसबा पेठेतल्या फडके हौदापाशी साजऱ्या होणाऱ्या उत्सवाला पाचशेपेक्षा जास्त भाविक येतात. त्यांची महाप्रसादाची सोय मी करीत असते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतात. यंदा ही परंपरा दूर ठेवत मी ही मदत दिली आहे. प्रभु रामाने जसे लंकेमध्ये जाण्याकरीता सेतू बांधला, त्यामध्ये अनेकांनी खारीचा वाटा उचलला. तसेच मी देखील या लढयामध्ये खारीचा वाटा देत आहे.