राज्यातील धरणांमध्ये ८६% पाणीसाठा जमा; सप्टेंबरची सरासरी ओलांडली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 09:58 AM2024-09-27T09:58:44+5:302024-09-27T09:58:59+5:30
दुष्काळी मराठवाड्यातही यंदा ७३ टक्के पाणीसाठा
पुणे : राज्यात मुसळधार पावसामुळे एकीकडे शेती पिकांचे नुकसान होत असून धरणांमधील पाणीसाठ्यात मात्र, झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत सर्व विभागांत मिळून ८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला धरणांमध्ये ७० टक्के पाणीसाठा होता.
यंदा सर्वाधिक ९४ टक्के पाणीसाठा कोकण विभागात असून दुष्काळी मराठवाड्यातही ७३ टक्के पाणीसाठा आहे. राज्यामध्ये सप्टेंबरच्या पावसाने सरासरी ओलांडली असून आतापर्यंत १०३ टक्के पावसाची नोंद कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.
जुलै व ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला. आता सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे यात आणखी वाढ झाली आहे.
लघू प्रकल्पांमध्ये तुलनेने कमी साठा
राज्यातील सर्व विभागांमधील मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा ९१ टक्क्यांच्या पुढे आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ७३.५४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र, लघू प्रकल्पांमध्ये पाणीसाठा तुलनेने कमी असून आतापर्यंत ५१.६१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
धरणांमधील पाणीसाठा
२०२४ २०२३ पाणीसाठा (टक्क्यांत)
नागपूर ८७.७५ ८४.४१
अमरावती ८९.९२ ७६.२८
संभाजीनगर ७३.५५ ३४.५६
नाशिक ८१.४८ ७१.५४
पुणे ९०.६८ ७५.२०
कोकण ९४.२१ ९४.०५