हवेलीत ८७३ उमेदवार निवडणूक रिंगणात
By admin | Published: July 25, 2015 04:55 AM2015-07-25T04:55:34+5:302015-07-25T04:55:34+5:30
हवेली तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका, तर ८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका अशा एकूण ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका, तर ८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका अशा एकूण ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ४ आॅगस्ट रोजी होत आहेत. त्यामध्ये पंचवार्षिक निवडणुकीसाठी १८३५, तर पोटनिवडणुकीसाठी ३४ असे एकूण १,८६९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांतील १,८०९ अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ८०५ उमेदवारांनी माघार घेतल्याने ८७३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
अष्टापूर, डोणजे, जांभळी, सागरूण या चार गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तसेच कल्याण वगळता फुरसुंगी, आव्हाळवाडी, वाडेबोल्हाई, मालखेड, खामगाव मावळ, बुर्केगाव, होळकरवाडी या गावांच्या पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यांच्यासमवेत विविध गावांतील १३१ सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती हवेलीचे तहसीलदार दगडू कुंभार व निवासी नायब तहसीलदार दिलीप बांदल यांनी दिली.
उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (२३ जुलै) हवेलीतील ५७ ग्रामपंचायतीचे इच्छुक ऊमेदवार त्यांचे कार्यकर्ते व पॅनलप्रमुख यांच्या अभूतपूर्व गर्दीमुळे शिवाजीनगर येथील शासकीय गोदाम आवाराला जत्रेचे स्वरूप आले होते. पॅनलमधील उमेदवारी निश्चित करताना नेत्यांची दमछाक होताना दिसत होती. पॅनलविरहित अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या उमेदवारांना ते विनंती करताना दिसत होते. प्रसंगी एखाद्या पदाचे आमिष दाखवून त्यांना माघार घेण्यासाठी भाग पाडल्याची नीतीही काहींनी अवलंबली, तर यासाठी काहींनी साम-दाम-दंड-भेद यांचाही वापर केला. ज्यांची उमेदवारी निश्चित ते खूष, तर ज्यांना डावलले गेले ते तुमच्या विरोधकांचा खुलेआम प्रचार करणार, अशा धमक्या देऊन नाराजीने परतताना दिसत होते. यामुळे पॅनलप्रमुखाच्या चेहऱ्यावरही नाराजीची छटा दिसत होती.
(वार्ताहर)