PMC | वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीसाठी ८८ कोटी; पालिका काढणार निविदा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 01:21 PM2022-12-31T13:21:18+5:302022-12-31T13:23:04+5:30
या महाविद्यालयाला आर्थिक वर्षांसाठी १०८ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार...
पुणे : महापालिकेच्या भारतरत्न डॉ.अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारत बांधण्यासाठी ८८ कोटी रुपयांची लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासही मान्यता देण्यात आली. या महाविद्यालयाला आर्थिक वर्षांसाठी १०८ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.
भारतरत्न डॉ.अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे कामकाज नियमित सुरू असून, पुढील शैक्षणिक वर्षात १०० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी दुसऱ्या वर्षात जाईल, तर १०० नवे विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतील. महाविद्यालयासाठी शैक्षणिक, प्रशासनिक व अन्य खर्च लक्षात घेता, २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात १०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता, महाविद्यालयाच्या परिसरात वसतिगृह उभारणे आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारत उभारण्यासाठी ८८ कोटींची निविदाप्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. मात्र, महाविद्यालयासाठीची सेवा नियमावली राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. महाविद्यालयासाठी १७४ पदे मंजूर आहेत. यातील एक तृतीयांश पदे सध्या रिक्त आहेत, असेही विक्रम कुमार यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या अनुभवासाठी खासगी रुग्णालयाशी करार
वैद्यकीय महाविद्यालयाशी रुग्णालय संलग्न असणे बंधनकारक आहे. त्यानुसार, महापालिकेच्या या वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालिकेचेच कमला नेहरू रुग्णालय संलग्न आहे. मात्र, आता महाविद्यालयात दुसरी तुकडी दाखल होईल. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुरेसा अनुभव मिळावा, यासाठी शहरातील खासगी रुग्णालयाशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.