महापालिकेच्या ९०० सुरक्षा रक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड
By admin | Published: April 9, 2017 04:47 AM2017-04-09T04:47:52+5:302017-04-09T04:47:52+5:30
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सन २०१७-१८च्या अंदाजपत्रकामध्ये सुरक्षारक्षकांसाठी तरतूदच केली नाही. यामुळे पुण्यातील अनेक महत्त्वाचे प्रामुख्याने पाणी पुरवठ्याचे
पुणे : महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सन २०१७-१८च्या अंदाजपत्रकामध्ये सुरक्षारक्षकांसाठी तरतूदच केली नाही. यामुळे पुण्यातील अनेक महत्त्वाचे प्रामुख्याने पाणी पुरवठ्याचे प्रकल्प, विविध उद्यानांची सुरक्षा भविष्यकाळात रामभरोसेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे मात्र महापालिकेच्या तब्बल ९०० सुरक्षा रक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड ओढवली आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील विविध उद्याने, महत्त्वाचे प्रकल्प, वेगवेगळी कार्यालये येथे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये महापालिकेचे काही जण सेवक आहेत तर काही जणांची खाजगी एजन्सीच्या मार्फत कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या काही वर्षांत शहरात उद्यानांची संख्या, नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्र, जलतरण तलाव यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय पर्वती जलकेंद्रासारखे अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची सुरक्षादेखील महत्त्वाची आहे. त्यात क्षेत्रीय कार्यालये, महापालिका भवन येथे तर सुरक्षा रक्षकांची मोठी फौजच तैनात असते. यामुळे गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या वतीने आॅऊट सोर्सिंग करून कंत्राटी पद्धतीवर या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे.
आयुक्तांनी अंदाजपत्रकामध्ये सुरक्षारक्षकांसाठी तरतूद कमी केल्याने शहरातील जवळपास ९०० कंत्राटी सुरक्षारक्षकांना कमी करावे लागणार असल्याची चिन्हे आहेत.
आयुक्तांच्या अंदाजपत्रकामध्ये सुरक्षारक्षकांच्या बजेटवर स्थायी समिती किती तरतूद करणार यावरच या सुरक्षारक्षकांचे भवितव्य अवलंबून आहे.
(प्रतिनिधी)
- महापालिकेच्या सर्व मिळकतींच्या संरक्षणासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये दर वर्षी सरासरी ३५ ते ४० कोटी रुपयांची तरतूद केली जाते. परंतु महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सुरक्षा रक्षकांच्या अंदाजपत्रकाला यंदा मोठा कट लावला असून, सुरक्षा रक्षकांसाठीचे बजेट निम्म्यावरच आणून ठेवले आहे. महापालिकेकडे सध्या सुमारे १७५० सुरक्षारक्षक कार्यरत आहेत.