हवाला रॅकेट प्रकरणी ९ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:32 AM2020-12-04T04:32:13+5:302020-12-04T04:32:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुटखा विक्रीच्या पैशातील हवाला रॅकेट प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने बुधवारी रात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुटखा विक्रीच्या पैशातील हवाला रॅकेट प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने बुधवारी रात्री ५ ठिकाणी छापे घालून ९ जणांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ४७ लाख ३८ हजार रुपयांची रोकड व इतर साहित्य जप्त केले आहे.
हितेश माणिकलाल गज्जर (वय ४८, रा. गंगाधाम, कोंढवा), अविनाश कांतीलाल व्यास (वय ४७, रा. बुधवार पेठ), राहूलकुमार महेंद्रभाई पटेल (वय ३८, रा. शुक्रवार पेठ), जिग्नेश नटवरलाल पटेल (वय ४६, रा. गुरूदेव अपार्टमेंट, शुक्रवार पेठ), जयेश मुन्नाभाई दवे (वय ४६, रा. मंत्री किशोर बिल्डींग, बुधवार पेठ), विपूल सतीश पटेल (वय ३८, रा. मंत्री किशोर बिल्डींग, बुधवार पेठ), गजेंद्र रामभाई पटेल (वय ४७, रा. शनिवार पेठ) आणि किरणसिंग हिमतुली चौहान (वय २९, रा. बुधवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.दरम्यान न्यायालयात हजर करण्यात आलेल्या नऊ जणांना जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक प्रवीण भागुजी कराळे (वय 38) यांनी फिर्याद दिली आहे.
बुधवार पेठ व शनिवार पेठेतील मंत्री किशोर आर्केड येथील ३ कार्यालये, शनिवार पेठेतील गणेश कृपा पेपर गल्ली या पाच ठिकाणी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखा युनिट चारचे पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांना माहिती मिळाली, की खराडीत सुरेश अगरवाल (वय ५४, रा. खराडी) हा कस्टम ड्युटी चुकवून पानमसाला, गुटखा, परदेशी बनावटीच्या सिगारेटची विक्री करत आहे. त्यानुसार अगरवाल याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने नवनाथ नामदेव काळभोर गुटखा पुरवित असल्याची कबुली दिली होती.
गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत गुटख्याचे मुख्य दोन विक्रेते असून हवाला मार्फत पैशांची देवाण-घेवाण होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ पथके तयार करण्यात आल्या होत्या. बुधवारी सकाळी ७ वाजता ५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. तेथील मिळालेली रोकड व इतर साहित्य याची मोजदाद रात्री १० वाजेपर्यंत सुरु होती. या ठिकाणी पोलिसांना ३ कोटी ४७ लाखांची रोकड, ९ मोबाईल, २ डीव्हीआर, २ पैसे मोजण्याचे मशीन असा ऐवज जप्त करण्यात आला.
या पाच ठिकाणाहून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, डॉ. प्रियांका नारनवरे, पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, सहायक निरीक्षक संदीप जमदाडे, उपनिरीक्षक विजय झंजाड, शशिकांत शिंदे, अंमलदार गणेश साळुंखे, शंकर पाटील, दत्ता फुलसुंदर प्रवीण भालचिन, नागेश कुवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
----------------------------------