बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडून ९ कोटींचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:09 IST2024-12-11T15:09:06+5:302024-12-11T15:09:16+5:30
बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ताळेबंद पत्रकाची पडताळणी केल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकाने पदाचा गैरवापर करून महिला क्लार्कच्या कोडचा वापर करत बनावट कागदपत्रे जमा केल्याचे उघडकीस

बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडून ९ कोटींचा अपहार
बारामती : शहरातील पंढरपूर अर्बन बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडून ९ कोटी ३ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बॅंकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक कृष्णकुमार पुरुषोत्तम पेंडाल (रा. कोर्टी रोड, परिचारकनगर, पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित देशपांडे, असे या गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापकांचे नाव आहे.
देशपांडे हे पंढरपूर अर्बन बँकेच्याबारामतीतील शाखेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ताळेबंद पत्रकाची पडताळणी केल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकाने पदाचा गैरवापर करून महिला क्लार्कच्या कोडचा वापर करत बनावट कागदपत्रे जमा केल्याचे उघडकीस आले. ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून बारामतीतील शाखेच्या सस्पेन्स रिसिव्हेबल खात्यातून अधिकार नसताना २ कोटी ३० लाख रुपये परस्पर उचलून धन्वंतरी नागरी पतसंस्थेमध्ये ठेवले. धन्वंतरी नागरी पतसंस्थेमध्ये ओडीटीआर ५ खाती उघडून त्यामध्ये ३ कोटी २३ लाख ७२ हजार ८९७ रुपये जमा केले. बँक ऑफ बडोदामध्ये भरणा करावयाची रक्कम म्हणून ३१ लाख रुपये काढले. त्याचीही परस्पर विल्हेवाट लावण्यात आली.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांना हा प्रकार गैरव्यवहार असल्याचे दिसून आले. त्यांनी बँकेच्या मुख्य शाखेतील व्यवस्थापक कृष्णकुमार पुरुषोत्तम पेंडल यांना अधिक तपास करण्याची सूचना केली. त्यानंतर पेंडाल यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास नाळे करीत आहेत.
बनावट दागिने ठेवण्याचाही घडला प्रकार
देशपांडे यांनी बँकेत ठेवलेल्या ग्राहकांच्या सोनेतारण कर्ज खात्याच्या ८३ खातेदारांचे बँकेत ठेवलेले खरे दागिने काढून तेथे बनावट दागिने ठेवण्याचा देखील प्रकार केला. खरे दागिने मात्र बाहेरील फायनान्स कंपन्यांना देऊन त्यावर कर्ज काढले आणि १० ग्राहकांच्या नावाने बनावट खाते काढली. त्यांच्या बनावट सह्या करून त्या खात्यावर कर्ज वितरित केल्याचे दाखवले व बँकेत बनावट सोने ठेवले. या माध्यमातून तब्बल ३७ लाख ५६ हजार ८०३ रुपयांचा अपहार केल्याचे देखील फिर्यादीत नमूद केले आहे. बँकेतील सोनेतारण कर्ज खात्याच्या प्रकरणांमध्ये ३ कोटी १८ लाख ३७ हजार रुपयांचा अपहार झाला, असे देखील फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. अशाप्रकारे बँकेची ९ कोटी ३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.