रिव्हॉल्वरसह ९ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:15 AM2017-08-10T03:15:48+5:302017-08-10T03:15:48+5:30
माण (मुळशी) येथील पेट्रोलपंपावर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाºया ९ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने अटक केली.
पुणे : माण (मुळशी) येथील पेट्रोलपंपावर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाºया ९ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने अटक केली. कोयते, रिव्हॉल्वरसारख्या घातक शस्त्रांसह आढळलेल्या या टोळक्यामध्ये मुळशीच्या टोळीयुद्धातील एका गुंडाचा समावेश असून एका लोकप्रतिधीचा खून करण्यासाठी पैसे जमा करण्यासाठी आरोपी पेट्रोलपंपावर दरोडा घालणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उमेश वाघुलक र (माण) योगेश भाऊ गुरव (विकास मित्र मंडळाजवळ, कर्वे रस्ता) योगेश अंकुश वेताळ, विशाल नवनाथ वेताळ, विशाल आनंदा कळसकर (तिघेही रा. जि. प. शाळेजवळ, मलठण, शिरूर), चंद्रकांत दोरसिंग थापा (लोंढे चाळ, कासारवाडी) फिरोज आयुब खान (दळवीनगर, चिंचवड), अन्वर हसन मुलाणी (भोंडवे वस्ती, रावेत), आकाश प्रकाश रेणुसे (पाबे, वेल्हा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ पिस्टल, १ रिव्हॉल्वर, २८ राऊंड, ५ कोयते अशी शस्त्रे सापडली. दोन चारचाकी आणि दोन दुचाकींसह ती जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये उमेश वाघुलकर याने सर्वांना जमा केले असून माण येथे राहणारे उपसभापती पांडुरंग वझरकर यांच्याशी असलेल्या भांडणांमुळे तो त्यांना ठार करण्याच्या प्रयत्नात होता. त्यांना संपविल्यानंतर या टोळक्यातील प्रत्येकाला तो २ लाख रुपये देणार होता. ही रक्कम जमा करण्यासाठीच तो लक्ष्मी पेट्रोलपंपावर दरोडा घालणार होता. अटक आरोपींमध्ये योगेश भाऊ गुरव हा कुख्यात शरद मोहोळ टोळीचा सदस्य असून तो सध्या गणेश मारणे याच्या खूनप्रकरणी शिक्षा भोगत होता. मे महिन्यात तो ३० दिवसांच्या पॅरोलवर सुटला, तेव्हापासूनच तो फरार होता.