Pune Crime | मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचे ९ जण अटकेत; २९ मोटारसायकल केल्या हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 06:27 PM2023-03-10T18:27:51+5:302023-03-10T18:30:02+5:30
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई...
नारायणगाव (पुणे) : मोटारसायकल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने केला असून ९ जणांच्या टोळीला अटक करून १० लाख रुपयांच्या २९ मोटारसायकल जप्त केल्या आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
अमोल मधे (रा. वाघवाडी, जि. नगर), विजय मधे (रा. निमदरी , जि. नगर), संतोष मधे (रा. केळेवाडी , जि. नगर), संदीप मधे, (रा. केळेवाडी, जि. नगर), विकास मधे (रा. पवळदरा मधेवस्ती पोखरी, जि. नगर), विजय जाधव (रा. कुरकुंडी, जि. नगर), सुनील मेंगाळ (रा. धरणमळई वाडी, ता. संगमनेर), भारत मेंगाळ (रा. गारोळे पठार, जि अ. नगर), मयूर मेंगाळ (रा. आंबीदुमाला, जि. नगर) या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
जुन्नर विभागात काम करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोटारसायकल चोरी करणारे आंतरजिल्हा टोळीची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीचे आधारे तपास पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील आंतरजिल्हा टोळीच्या मुख्य दोन म्होरक्यांसह नऊ जणांना जांबूत फाटा परिसरातून ताब्यात घेतले. पुणे ग्रामीण अहमदनगर, ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे व घरफोडी चोरीचे असे एकूण २६ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या टोळीकडून एकूण १० लाख रुपये किमतीच्या २९ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. या आरोपींना नारायणगाव आणि ओतूर ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
या आरोपींकडून नारायणगाव ४, घोडेगाव ५, ओतूर ३, जुन्नर ३, मंचर २, खेड २, रांजणगाव १ शिरूर १, अकोले २, आश्वी १, लोणी १, टोकावडे १ असे एकूण २६ गुन्हे उघडकीस आले असून एकूण ३३ घटना उघडकीस आलेल्या आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, महादेव शेलार, गणेश जगदाळे, तुषार पंदारे, दीपक साबळे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, मंगेश थिगळे, राजू मोमीण, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, संदीप वारे, अक्षय नवले, चासफी मुकुंद कदम, अक्षय सुपे यांनी केली आहे.