Pune: ललित पाटील पलायन प्रकरणात एका अधिकाऱ्यासह ९ पोलिस निलंबित
By विवेक भुसे | Published: October 3, 2023 08:16 PM2023-10-03T20:16:43+5:302023-10-03T20:17:36+5:30
एका अधिकाऱ्यासह ९ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले...
पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्ज रॅकेट चालविणारा आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या ललित पाटील प्रकरणी एका अधिकाऱ्यासह ९ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. ललित पाटील ड्रग्ज विक्री प्रकरणात ४ कर्मचारी तर पाटील याने ससूनमधून पलायन केल्या प्रकरणी महिला अधिकाऱ्यासह ५ जणांना निलंबित करण्यात आले आहे. सहायक फौजदार जर्नादन काळे, पोलिस कर्मचारी विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे आणि दिगंबर चंदनशिव अशी ड्रग्ज रॅकेट प्रकरणात निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, पोलिस नाईक नाथाराम काळे, पिरप्पा बनसोडे आणि अमित जाधव अशी ललित पाटील पलायन प्रकरणात निलंबित केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अपर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आले आहेत.
ससून रुग्णालयात ड्रग्ज आल्या प्रकरणात चौघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. ससून रुग्णालयात आलेल्यांकडील संशयास्पद वस्तू तपासण्याची जबाबदारी या चौघांकडे होती. तरीही ससून रुग्णालयात ड्रग्ज आणले गेले. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चौघांना निलंबित करण्यात आले आहे.
ललित पाटील हा ड्रग्ज माफिया आहे. त्याच्या बंदोबस्तासाठी कोर्ट पार्टी नियुक्त करण्यात आली होती. दोन दिवसापूर्वीच ससून रुग्णालयात २ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले होते. त्यात ललित पाटील हा मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले होते. त्याच्याकडे दोन महागडे मोबाईल आढळून आले होते. त्याच्याकडे चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेने ससून रुग्णालय व कारागृहाकडे पत्र दिले होते. असा महत्वाच्या आरोपीच्या बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे व इतरांची नेमणुक करण्यात आली होती. असे असताना ललित पाटील या एक्सरे काढण्यासाठी तळमजल्यावर आणण्यात येत असताना ललित पाटील हा पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळून गेला. बंदोबस्तावर नेमण्यात आलेल्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने पोलिस दलाची बदनामी झाल्याने पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे.