मेट्रोसाठी लागणार ९ हजार टनांचे रूळ : स्वित्झर्लंडमध्ये उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 08:00 AM2019-06-16T08:00:00+5:302019-06-16T08:00:06+5:30
मेट्रोसाठी वापरण्यात येणारे हे रूळ हेड हार्डन या प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञानाने बनवण्यात आले आहे.
पुणे : मेट्रो मार्गावर लवकरच रूळ बसवण्यााच्या कामास सुरूवात करण्यात येणार आहे. एका किलोमीटरच्या मार्गाला १२० टनांचे रूळ लागणार असून एकूण ९ हजार टन रूळ संपुर्ण मेट्रो मार्गासाठी लागणार आहेत. नवे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेले हे रूळ स्वित्झर्लंडमधील एका कंपनीने त्यांच्या सैबेरियामधील कारखान्यात उत्पादित केले आहेत.
मेट्रोसाठी वापरण्यात येणारे हे रूळ हेड हार्डन या प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञानाने बनवण्यात आले आहे. जगभरात याच प्रकारचे रूळ वापरण्यात येतात. १८ मीटर व २५ मीटर अशा दोन प्रकारच्या लांबीत हे रूळ आहेत. ते फ्लॅश बट व अॅल्युमिना थर्मल वेल्डिेंग या तंत्रज्ञानाने जोडले जातील. त्यानंतर त्याचे अत्याधुनिक अल्ट्रा सॉनिक यंत्राद्वारे तपासले जातील. रूळांचा वरचा भाग विशेष तंत्रज्ञानाद्वारे कठीण करण्यात आलेला आहे.
रूळ बसवण्यासाठीही जगात सर्वत्र वापरले जाणारे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. रेल्वे रूळ त्याच्या खालील बाजूस दगडांच्या खडीचा थर देऊन नंतर त्यावर टाकले जातात. त्यामुळे रुळांवरून रेल्वे जाताना रुळ खाली दबले जातात व कुशन सारखा परिणाम साधला जातो. प्रवाशांनाही त्याचा अनुभव येतो. मात्र मेट्रो च्या या रुळांच्या खाली खडी न टाकता नवे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी तर वाटेलच शिवाय या तंत्रज्ञानामुळे कमीत कमी देखभाल दुरूस्तीची गरज पडते. उन्नत व भुयारी अशा दोन्ही मार्गांवरील रुळांना हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा मेट्रोचा एकूण ३१.५ किलोमीटरचा मार्ग आहे. यातील कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मार्ग भूयारी आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी-चिंचवड ते बोपोडी या मार्गावर प्राधान्याने हे रूळ बसवण्यात येतील. डिसेंबर २०१९ अखेर हे दोन्ही मार्ग सुरू करण्याचे उद्दीष्ट महामेट्रो कंपनीने ठेवले आहे. त्यानुसार या मार्गावरील सर्व खांबांचे व त्यावरील कॅप्सचे काम पुर्ण होत आले आहे. त्यामुळे रूळ टाकण्याच्या कामास सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.