एका मंत्र्यांसाठी ९ गाड्या अन् ५० पोलिसांचा ताफा; कोण ठरवते राज्यातील VIP च्या सुरक्षेचे मानक?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 07:30 PM2022-05-17T19:30:33+5:302022-05-17T19:31:19+5:30
सुरक्षा बंदोबस्ताची होते रंगीत तालीम
पुणे : देश व राज्यातील महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींना सुरक्षा पुरविली जाते. केंद्रीय इन्व्हेस्टिकेशन ब्युरोने या सुरक्षेचे मानक ठरविले आहेत, तर राज्यातील व्हीआयपीच्या सुरक्षेचे मानक राज्य गृप्तवार्ता विभागाने ठरविले आहेत. त्यानुसार राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि केंद्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त निश्चित केला जातो.
एक दिव आधीच रंगीत तालीम
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा दौरा असल्यास सुरक्षिततेसाठी ते कोणत्या मार्गानि येणार, किती वाजता येणार, याचा मिनिट टू मिनिट अभ्यास केला जातो. त्यासाठी सुरक्षा अधिकारी एक दिवस अगोदरच या सुरक्षा बंदोबस्ताची रंगीत तालीम करून घेतात. जेणेकरून कुठलीही चूक होणार नाही.
असे आहेत सुरक्षेचे प्रकार-
देशात ४ प्रकारच्या सुरक्षा श्रेण्या आहेत. त्यात एक्स, वाय झेड आणि झेड प्लस अशा उच्चस्तरीय सुरक्षा श्रेणी आहेत.
एक्स सुरक्षा ही सर्वात मूलभूत संरक्षणाची पातळी आहे. त्यात वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि सोबत २ सुरक्षा कर्मचारी असतात.
वाय सुरक्षा यात १ किंवा २. कमांडोसमवेत ११ सुरक्षा कर्मचारी तैनात असतात, त्यांचे २ पीएसओदेखील आहेत.
झेड सुरक्षेमध्ये ४ किंवा ५ एनएसजी कमांडोजसह २२ सुरक्षा कर्मचारी असतात. याशिवाय आयटीबीपी, एनएसजी किंवा सीआरपीएफ पोलीस कर्मचारी तैनात असतात. झेड सुरक्षेमध्ये एस्कॉर्ट कारदेखील देण्यात येते.
झेड प्लस सुरक्षा : यात एकूण ५५ सुरक्षा कर्मचारी असतात. त्यात १० एनएसजी कमांडो कार्यरत असतात. त्यामध्ये तैनात कमांडोकडे सबमशीन गन असते. झेड प्लसमध्ये तीन स्तराची सुरक्षा असते. झेड प्लस सुरक्षा सामान्यतः अशा केंद्रीय मंत्र्यांना त्या व्यक्तींना दिली जाते ज्यांना दहशतवादी हल्ल्याचा धोका असतो.
एसपीजी सुरक्षा : स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ही मर्यादित व्हीव्हीआयपींना दिली जाते. एसपीजीची सुरक्षा चार स्तराची असते. पंतप्रधानांना ही सुरक्षा दिली जाते. देशातील सर्वात महागडी सुरक्षा समजली जाते.
पुणे पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण:
पुणे हे देशातील महत्त्वाचे शहर असल्याने येथे येणाऱ्या व जाणाऱ्या व्हीआयपींची संख्या मोठी आहे. या व्हीआयपीच्या सभा, कार्यक्रमांच्या बंदोबस्ताचा मोठा ताण शहर पोलीस दलावर येत असतो. त्याचबरोबर सुट्टी, शनिवार, रविवारी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते, मंत्री, न्यायमूर्ती हे मुंबईतून आपल्या गावी तसेच महाबळेश्वरला जात असतात. त्यांना एस्कॉर्ट द्यावा लागतो.