Zika virus| राज्यात झिकाचे ९ रुग्ण, त्यातील ७ जण पुण्याचे; 'या' कारणामुळे होतो संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 09:39 AM2024-07-04T09:39:11+5:302024-07-04T09:39:34+5:30
झिकाचे राज्यातील पहिले रुग्ण पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे जुलै २०२१ मध्ये आढळले हाेते....
पुणे : राज्यात गेल्या चार वर्षांत झिकाचे २९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ९ रुग्ण यंदा आढळले असून, त्यात पुण्यातील ७; तर काेल्हापूर आणि संगमनेर येथेही प्रत्येकी एक रुग्ण आहे, अशी माहिती राज्याच्या आराेग्य विभागाने दिली आहे.
झिकाचे राज्यातील पहिले रुग्ण पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे जुलै २०२१ मध्ये आढळले हाेते. आतापर्यंत ही संख्या २९ वर गेली आहे. यंदा नऊ रुग्ण आढळले असून, त्यात २४ मे ला काेल्हापूरमधील करवीर येथे १, अहमदनगरच्या संगमनेर येथे १ रुग्ण आहे. त्यानंतर जून व जुलै महिन्यात पुण्यातील एरंडवणे येथे ५ आणि मुंढवा येथे दाेन रुग्ण आढळले आहेत.
झिकाचा डास दिवसा मारताे डंक :
झिका हा विषाणू रोग मुख्यतः एडिस डासांद्वारे प्रसारित होणाऱ्या विषाणूमुळे होतो. विशेष म्हणजे ताे दिवसा चावतो. त्यामुळे दिवसाही डासांपासून संरक्षित राहण्यासाठी फूलबाह्यांचे कपडे घालणे व याेग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. लक्षणांनुसार उपचार करणे हाच उपाय आहे.
या कारणामुळे होतो संसर्ग
१. झिकाबाधित डासांपासून
२. लैंगिक संपर्काद्वारे
३. गर्भधारणेदरम्यान
४. आईपासून गर्भापर्यंत संक्रमण
५. रक्त आणि रक्त उत्पादनांचे रक्त संक्रमण
६. अवयव प्रत्यारोपणाद्वारे
उपचार काय?
• रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
• निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचे सेवन करावे.
• तापावर पॅरासिटेमॉल औषध वापरावे.
• ऑस्पिरीन अथवा एन.एस.ए.आय.डी. प्रकारातील औषधांचा वापर करू नये.
आराेग्य विभागाकडून नागरिकांसाठी आवाहन :
- ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवावे.
- खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीसुद्धा त्यांचेकडे अशा प्रकारचे रुग्ण दिसून आल्यास त्याचा नमुना एनआयव्ही येथून तपासून घ्यावा.
- घरातील, गावातील सर्व पाणीसाठे वाहते करावेत. पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत.
- जे सिमेंटचे कंटेनर रिकामे करता येत नाहीत अशांमध्ये गप्पी मासे किंवा टेमिफाॅस या अळी नाशकांचा वापर करावा.
- रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. दिवसा पूर्ण कपड्यांमध्ये राहावे.