औषधांच्या नावाखाली गाेव्यातून आणला ९० लाखांचा मद्यसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 02:17 PM2023-12-20T14:17:33+5:302023-12-20T14:18:06+5:30
उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाकडून ४५ हजार ६०० बाटल्यांचा कंटेनर जप्त
पुणे: औषधे असल्याचे सांगून त्यांच्या नावाखाली गोव्याहून चोरटी दारू वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. कंटेनरमध्ये औषधांच्या जागी ९० लाख रुपयांच्या व्हिस्कीच्या ४५ हजार ६०० बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी वाहन चालक विपुल देवीलाल नट (वय ३२, रा. बांसवाडा, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे.
नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर चाेरून आणलेल्या मद्याचा वापर होत असल्याचे लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक कार्यान्वित झाले. गोव्यामध्ये बनविलेली विदेशी दारू राज्यात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने खेड-शिवापूर टोलनाक्यावर सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर आल्यावर पोलिसांनी चौकशी केल्यावर चालकाने आत औषधे असल्याचे सांगून त्या औषधांचे बिल, टॅक्स इन्व्हाईस व ई वे बिल दाखवून चकवा देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी खात्री करण्यासाठी कंटेनर उघडला. तेव्हा आतमध्ये व्हिस्कीच्या बाटल्या आढळून आल्या.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काच्या विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक ए.सी.फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवान अमर कांबळे, अहमद शेख, एस.एस.पोंधे, अनिल थोरात, पी. टी. कदम, भारत नेमाडे, अमोल दळवी यांनी केली. दुय्यम निरीक्षक ए.बी पाटील पुढील तपास करत आहेत.