महिन्यात ९० टक्के बस मार्गावर येतील
By admin | Published: June 9, 2015 05:55 AM2015-06-09T05:55:11+5:302015-06-09T05:55:11+5:30
महिनाभरात ९० टक्के बस मार्गावर आणणार असल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी दिली.
पुणे : पीएमपीच्या ताफ्यातील किरकोळ दुरुस्तीअभावी जागेवर उभ्या असलेल्या बस दुरुस्त करण्याला प्राधान्य देत महिनाभरात ९० टक्के बस मार्गावर आणणार असल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी दिली. सात वर्षांत सहाव्यांचा बदली झालेल्या कृष्णा यांनी ‘मी परिस्थितीचा विचार करीत नाही. परिस्थिती बदलून दाखवितो,’ असा ठाम विश्वासही पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
पीएमपीचे चौदावे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) म्हणून अभिषेक कृष्णा यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. राज्य शासनाने मागील २० दिवसांपूर्वी त्यांची सीएमडी म्हणून नियुक्ती केली होती. पदभार स्वीकारण्यास त्यांना विलंब होत असल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने पदभार स्वीकारण्यास वेळ लागल्याचे कृष्णा यांनी स्पष्ट केले. त्यांची मागील सात वर्षांत सहा पदांवर बदली झाली आहे. ‘मी कधीही कुठल्या पदाचा आग्रह धरत नाही किंवा बदलीची मागणी करीत नाही. जी जबाबदारी मिळेल ती पार पाडतो. पीएमपीची जबाबदारी स्वीकारण्याबाबतही कधी नकारात्मक दृष्टिकोन नव्हता,’ असे कृष्णा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. कृष्णा यांनी पहिल्या दिवशी सर्व विभागप्रमुख, अधिकारी, तसेच कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चाही चर्चा करून कामकाजाची माहिती घेतली. महिनाभरात ९० ते ९५ टक्के बस मार्गावर आणण्याचे पहिले उद्दिष्ट असणार आहे. ताफ्यात काही बस दुरुस्तीअभावी उभ्या आहेत. त्या दुरूस्त करून मार्गावर आणण्याला प्राधान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
हायटेक पीएमपी हे स्वप्न...
पीएमपीची बससेवा हायटेक असली पाहिजे. ताफ्यातील प्रत्येक बसला ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्याचे स्वप्न असल्याचे अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. पीएमपीचा प्रत्येक आगार, कार्यालय, बस, बसथांबा, मार्ग फलक मॉडर्न असायला हवी. सध्या माहितीचे खूप स्रोत आहेत. त्याचा उपयोग व्हायला हवा. आयटी हे आवडीचे क्षेत्र असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. हे लगेच शक्य नसले, तरी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू, असे कृष्णा यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सकारात्मक...
पीएमपीच्या स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. पीएमपीमध्ये सुधारणा व्हायला हवी, असे त्यांंचेही मत असून ते सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पीएमपी सुधारण्यासाठी सहकार्य मिळेल, असे अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. पालकमंत्रीही खूप सकारात्मक आहेत. डॉ. श्रीकर परदेशी यांनी पीएमपी सुधारू शकते हे दाखवून दिले आहे. त्यांच्याशीही सातत्याने संपर्कात असून, यावर चर्चाही केली आहे, असे कृष्णा यांनी नमूद केले.
... तर शेवटी वेतन
कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याची तक्रार कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी कृष्णा
यांच्याकडे केली. त्यावर कृष्णा यांंनी ‘कंपनीला पुढे न्यायचे असेल, तर सीएमडीला शेवटी वेतन
मिळायला हवे. जर सीएमडीला सुरूवातीला वेतन मिळाले तर इतर सर्वांना वेळेवर वेतन मिळते, असा त्याचा अर्थ होतो,’ असे सांगत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्यानंतरच स्वत: वेतन घेणार असल्याचे संकेत दिले.
अधिकारी आताव्हॉट्स अॅपवर...
अभिषेक कृष्णा यांनी पहिल्याच दिवशी सर्व अधिकारी, तसेच कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना ‘व्हॉट्स अॅप’वर स्वतंत्रपणे ग्रुप करण्याच्या सूचना दिल्या. काही तक्रारी किंवा अडचणी असतील, तर या ग्रुपवरच चर्चा करता येईल. तसेच एखाद्या विषयावर सर्व अधिकाऱ्यांशी तातडीने बोलायचे असल्यास गु्रपवर चर्चा होऊ शकते. प्रत्येक वेळी कार्यालयात येऊन टेबलवर बसून चर्चा करून उपयोग नाही. यामध्ये वेळेचा खूप अपव्यय होतो, असे कृष्णा यांनी स्पष्ट केले.