जुन्नर तालुक्यातील ९० सरपंच पुणे – नाशिक महामार्गावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:17+5:302021-06-30T04:08:17+5:30
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईट कनेक्शन खंडित करण्यास महावितरण कंपनीकडून सुरुवात केल्याच्या निषेर्धात जिल्हा परिषद सदस्या आशा ...
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईट कनेक्शन खंडित करण्यास महावितरण कंपनीकडून सुरुवात केल्याच्या निषेर्धात जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यातील ९० सरपंचांनी तीव्र संताप व्यक्त करीत नारायणगाव येथील पुणे – नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
दरम्यान , पुणे –नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या ४० जणांवर नारायणगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
महावितरण कंपनीने ग्रामपंचायतींना थकबाकीच्या नोटिसा जारी करून स्ट्रीट लाईट कनेक्शन खंडित करण्यास सुरुवात केली आहे. वीज वितरण अधिकाऱ्यांनी ही कारवाई थांबबावी यासाठी जुन्नर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने ९० ग्रामपंचायतींच्या सरपंच यांनी नारायणगाव येथे रास्ता रोको करून महावितरण कंपनीचे नारायणगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनवणे यांना निवेदन दिले. हा रास्ता रोको जि. प. सदस्या आशा बुचके यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करण्यात आला. या वेळी विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, अर्चना माळवदकर, सरपंच योगेश पाटे, राजेंद्र मेहेर, प्रदीप थोरवे, महेश शेळके, दिलीप खिलारी, जंगल कोल्हे, रमेश ढवळे, सुभाष दळवी, सविता गायकवाड, अर्चना उबाळे, वैशाली तांबोळी, माया डोंगरे आदींसह विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.
रास्ता रोको आंदोलनाला मार्गदर्शन करताना आशा बुचके म्हणाल्या की, सर्व ग्रामपंचायतींचे वीजबिल १९६५ पासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा परिषद अदा करीत असताना गेल्या दोन वर्षांपासून स्ट्रीट लाईटचे बिल हे ग्रामपंचायतीने भरावे, असे शासनाने जिल्हा परिषदेला आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतीला नागरिकांस पथदिवे बसवून सोईसुविधा देणे बंधनकारक आहे. परंतु सध्या कोरोनाच्या संकटामुळे ग्रामस्थ आधीच त्रस्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत करभरणा करणे ग्रामस्थांना शक्य होत नाही. सध्या राज्यशासनाने १५ वा वित्त आयोग अंतर्गत ही बिले भरण्याचे आदेश काढलेला आहे. परंतु १५ वा वित्त आयोग हा केंद्र सरकार अंतर्गत येत असून निधीतील खर्च करण्यासाठी केंद्र शासनाने बंधित व अबंधित असा आदेश दिलेला असून, त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने हा निधी खर्च करण्यासाठी आराखडे मंजूर देखील केलेले आहे. तसेच १५ व्या वित्त आयोग अंतर्गत पाणी पुरवठा व स्ट्रीट लाईट बिल भरणेकामी केंद्र सरकारने कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट बिले भरावीत अशी मागणी बुचके यांनी केली.
याप्रसंगी संतोष खैरे, योगेश पाटे, महेश शेळके यांच्या सह अनेक सरपंच यांनी आपले विचार व्यक्त केले.
पुणे – नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या ४० जणांवर नारायणगाव पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या सह ४० जणांवर कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले. अशी माहिती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
जुन्नर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने आशा बुचके यांच्या मार्गदर्शनाखाली ९० गावांच्या सरपंचांनी नारायणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करून वीज वितरण कंपनीचे अभियंता सिद्धार्थ सोनवणे यांना निवेदन दिले.