Ashadhi wari 2024: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला ५६ दिंड्यातील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 02:53 PM2024-06-08T14:53:51+5:302024-06-08T14:54:38+5:30

प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात 'श्रीं'चे रथापुढील २० आणि रथामागील २७ यांसह अन्य ९ उपदिंड्या अशा एकूण ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे....

90 worshipers from each of the 56 Dindas enter the temple for the departure ceremony of Mauli | Ashadhi wari 2024: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला ५६ दिंड्यातील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश

Ashadhi wari 2024: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला ५६ दिंड्यातील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश

आळंदी (पुणे) : यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी २९ जूनला आळंदीतूनपंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरातील वारकरी संख्या ठरविण्यासंदर्भात जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दिंडी प्रमुख, फडकरी, मानकरी, चोपदार, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व आळंदी देवस्थानचे पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात 'श्रीं'चे रथापुढील २० आणि रथामागील २७ यांसह अन्य ९ उपदिंड्या अशा एकूण ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यभरातून असंख्य वारकरी व भाविक आळंदीत येत असतात. प्रत्येकाला हा प्रस्थान सोहळा स्वतःच्या नयनांनी अनुभवण्याची इच्छा असते. मात्र मंदिरातील क्षेत्रफळाचा विचार करता प्रमुख मानाच्या दिंड्यातील काही वारकऱ्यांना  मंदिरात प्रवेश दिला जातो. मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा रूढ आहे. प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.परिणामी प्रशासनावर ताण येतो. गतवर्षी मंदिर प्रवेशादरम्यान वारकरी व पोलीस यांच्यामध्ये वादाच्या घटना घडल्या होत्या. अनावश्यक घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

यंदा प्रस्थान सोहळ्याला मंदिरात किती वारकऱ्यांना प्रवेश दिला जावा याबाबत सामूहिक चर्चा करण्यात आली. अखेर मानाच्या २७ दिंड्यांसह अन्य ९ उपदिंड्यांच्या प्रत्येकी ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले. याप्रसंगी बैठकीला पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, प्रांतधिकारी जोगेंद्र कट्यारे, सहाय्यक पोलीस आयुक्त गौर, राणा महाराज वासकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, दिघी आळंदी वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, शहराध्यक्ष राहुल चव्हाण, उमेश महाराज बागडे आदिंसह दिंडीकरी, मानकरी, फडकरी आदी उपस्थित होते. 

अनावश्यक प्रवेश नको...

यंदा प्रस्थान सोहळ्यासाठी दिंड्यांमधील वारकरी संख्या निश्चित केली आहे. मात्र प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी वारकरी वगळता बंदोबस्ताचे पोलीस व त्यांचे नातेवाईक, देवस्थानचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे नातेवाईक तसेच ओळखीची अनावश्यक उपस्थिती असते. त्यामुळे मंदिरात मोठी गर्दी होते. यासाठी अनावश्यक गर्दीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

Web Title: 90 worshipers from each of the 56 Dindas enter the temple for the departure ceremony of Mauli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.