Raksha Bandhan: ९० वर्षे राखी नाही चुकली, बहीण माझ्या उन्हातील सावली! भाऊ-बहिणीच्या प्रेमाची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 07:08 PM2024-08-19T19:08:45+5:302024-08-19T19:10:01+5:30
सुरुवातीची ओवाळणी म्हणून बहिणीला १ पैसा दिला होता तर तिने माझ्या हातात राखी ऐवजी दोराच बांधला
केडगाव (दौंड): चौफुला ता.दौंड येथील रेवूबाई भगवान शेंडगे व भाऊ मल्हारी गंगाराम चोरमले यांनी ९० वर्षे न चुकता राखी पौर्णिमेला राखी बांधली. सुरुवातीची ओवाळणी म्हणून बहिणीला १ पैसा दिला होता तर तिने माझ्या हातात राखी ऐवजी दोराच बांधला होता. त्यावेळीच्या कठीण परिस्थितीनुसार रक्षाबंधनला अनन्य साधारण महत्त्व होते. पैसा आणि वस्तूंच्या पलीकडे बहिण भावातील अतूट बंधनाची प्रचिती या दोन भाऊ-बहीण प्रेम कहाणी ऐकल्यावर समजते.
मल्हारी गंगाराम चोरमले हे चोरमले घरातील सर्वात लहान भाऊ. बहिणीला मैलाच्या अंतरावर चौफुला येथे शेंडगे यांच्या घरात दिले. भावा बहिणीवर वर अनेक वेळा वेगवेगळी संकटे आली. भावाची परिस्थिती बेताची असल्याने बहीण रेवूबाई यांनी कधीही भावास मदतीस नाही म्हटले नाही. प्रत्येक रक्षाबंधनला भावाने चोळी बांगडी केलीच पाहिजे असं कधीही हट्ट धरला नाही. कधीही बहिणीला दुरावले नाही. नंतरही शेंडगे व चोरमले कुटुंबात सोयरीक झाली मात्र बहीण भावाच्या प्रेमामुळे कधीही नात्यात दुरावा निर्माण झाला नाही. लहानपणीच वडिलांच्या निधनानंतर आमच्या घरातील बहीणच वडील झाली होती. आम्हा दोन्ही भावंडांचे लग्न त्याचसोबत घराची आर्थिक बांधणी देखील बहीण रेवूबाई यांनीच केली.
बहिणीचे पती भगवान शेंडगे मुले २-४ वर्षांची असतानाच निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी बंधू चोरमले यांनी त्यावेळी उचलली होती. आज रोजी चोरमले यांचे कुटुंब आर्थिक प्रगतीपथावर आहे त्यासाठी बहिणीचा अमूल्य हातभार लागला. त्यांना बहिणीने तुम्हाला किती मदत केली असा प्रश्न विचारला त्यावेळी मल्हारी चोरमले यांना अश्रू अनावर झाले. वडीलानंतरचा सर्वात मोठा आधार माझी बहीणच आहे. एकमेकांच्या सुखदुःखात आर्थिक देवाणघेवाण कायमच होत आली.