महापालिकेमध्ये ९०० वाढीव सुरक्षारक्षकांची मागणी
By admin | Published: November 12, 2015 02:36 AM2015-11-12T02:36:19+5:302015-11-12T02:36:19+5:30
महापालिकेच्या सुरक्षा विभागाने १,५०० सुरक्षारक्षक नेमण्यास परवानगी देण्यात आली असता दोन हजार सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली असल्याने त्यांचे
पुणे : महापालिकेच्या सुरक्षा विभागाने १,५०० सुरक्षारक्षक नेमण्यास परवानगी देण्यात आली असता दोन हजार सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली असल्याने त्यांचे बिल अदा करण्यास काही नगरसेवकांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या सहा महिन्यांत महापालिकेच्या विविध विभागांनी सुरक्षा विभागाकडे १५६ प्रस्ताव देऊन साडेआठशे ते नऊशे वाढीव सुरक्षारक्षक देण्याची मागणी केली असल्याची माहिती उजेडात आली आहे.
महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या दोन हजार सुरक्षारक्षकांच्या वेतनापोटी १८ कोटी रुपयांची रक्कम स्थायी समितीने मंजूर केली. याला विरोध करून स्थायी समितीच्या काही सदस्यांनी फेरविचाराचा प्रस्ताव स्थायीकडे दाखल केला आहे. मुख्य सभेने १,५०० सुरक्षारक्षक नेमण्यास मंजुरी दिली असताना दोन हजार सुरक्षारक्षक भरण्यात आल्याने त्याला विरोध केला जात आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारतीसह १५ क्षेत्रीय कार्यालये, उद्याने, रुग्णालये, जलशुद्धीकरण
केंद्रांसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेकडून कंत्राटी पद्धतीने या सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येते. महापालिकेचा व्याप वाढत असल्याने सुरक्षारक्षकांची मागणीदेखील वाढत आहे. गेल्या सहा महिन्यांत महापालिकेच्या विविध
विभागांच्या खातेप्रमुखांनी सुरक्षा विभागाकडे १५६ प्रस्ताव सादर करून सुरक्षारक्षक पुरविण्याची मागणी केली आहे. काही विभागांना
तातडीची गरज असल्याने भरती प्रक्रिया राबवून ५२० जणांची नेमणूक करण्यात आली. पूर्वी महापालिकेकडे १,६०० सुरक्षारक्षक कार्यरत होते. नव्याने भरती झालेल्या ५२० जणांसह सध्या महापालिकेतील सुरक्षारक्षकांची संख्या दोन हजारांपर्यंत पोहोचली आहे.
विविध विभागांच्या मागणीनुसार अजून साडेतीनशे सुरक्षारक्षक कमी आहेत. मात्र, सध्या पालिकेतील भरती बंद करण्यात आली आहे. वाढीव सुरक्षारक्षकांची आवश्यकता असल्याने त्यांच्या नोकरीवर गदा आणली जाऊ नये, अशी मागणी सुरक्षारक्षकांच्या वतीने करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)