राज्यातील ९०० एकपडदा थिएटर बनलेत ‘भूत बंगला’! मोबाइल, ओटीटीचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 01:07 PM2023-05-24T13:07:21+5:302023-05-24T13:08:30+5:30
त्या जागी इतर व्यवसाय सुरू न केल्यास थिएटर चालकांनी जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे....
- श्रीकिशन काळे
पुणे : पूर्वीच्या काळी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे हे आनंददायी आणि प्रतिष्ठेचे समजले जायचे; पण हळूहळू एकपडदा थिएटर कमी होऊ लागले आणि मल्टिप्लेक्स सुरू झाले. त्यानंतर टीव्ही, मोबाइल, ओटीटीने तर एकपडदावर ‘संक्रांत’च आली. आता राज्यातील सुमारे ९०० एकपडदा थिएटर बंद पडले असून, त्यांची अवस्था भूत बंगल्यासारखी झाली आहे. त्या जागी इतर व्यवसाय सुरू न केल्यास थिएटर चालकांनी जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या आधी काही प्रमाणात हे थिएटर चालत होते; पण कोरोना व त्यानंतर या थिएटरचे आर्थिक गणित कोलमडले आणि त्यांना गाशा गुंडाळावा लागला. आता त्या जागेवर इतर व्यवसाय करू द्यावा अशी मागणी पुढे येत आहे. तसे न झाल्यास आम्ही जगायचे कसे? असा सवाल थिएटर चालक करत आहेत. कारण एकपडदा थिएटरमधून काहीच उत्पन्न मिळत नाही. सरकार परवानगी देईना आणि व्यवसायही चालेना, अशी अवस्था त्यांची झाली आहे. या जागांवर बहुउद्देशीय इमारती उभ्या करून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
सरकारने यापूर्वी थिएटरच्या नूतनीकरणबाबत सूचना केल्या आहेत. त्यात त्यांनी जर नूतनीकरण केले तर ५ वर्षांचा करार करण्याची तरतूद केली होती. त्यात जीएसटीचा अडथळा आला, म्हणून तो खर्च थिएटर मालकांना न परवडणारा असल्याने नूतनीकरण रखडले. आता त्या जागांवर इतर व्यवसाय सुरू केला तरच त्यांना जगण्यासाठी साधन मिळू शकते. कारण एकपडदा थिएटर आता पुन्हा पहिल्यासारखे उभे राहू शकत नाही. टीव्ही, ओटीटी, यूट्यूब, सोशल मीडियामुळे एकपडदा थिएटरमध्ये जाणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे याचा फटका थिएटर चालकांना बसत आहे.
हाऊसफुलचे वैभव आता नाही !
पंधरा-वीस वर्षांपूर्वी कोट्यवधींचा गल्ला जमा करणारे राज्यातील हजार-बाराशे थिएटर आता प्रचंड दुरवस्थेमध्ये आहेत. त्यातील जवळपास ९०० तर बंदच झाली आहेत. इतर थोडेफार तग धरून आहेत. पूर्वीसारखा आता व्यवसायदेखील होत नाही. हाऊसफुलचा फलक तर आता लागणे नाही. हीच खंत थिएटर चालकांची आहे.