राज्यात ९१ लाख ६८ हजार शेतकऱ्यांना मिळाला ओळख क्रमांक
By नितीन चौधरी | Updated: April 11, 2025 09:17 IST2025-04-11T09:16:07+5:302025-04-11T09:17:13+5:30
ॲग्रिस्टॅक योजनेतून जमीन आधारशी जोडण्याचा उपक्रम

राज्यात ९१ लाख ६८ हजार शेतकऱ्यांना मिळाला ओळख क्रमांक
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसेच ओळख क्रमांक देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत असून, या योजनेत आतापर्यंत ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देताना ओळख क्रमांक बंधनकारक केले असून, या लाभार्थ्यांच्या संख्येशी तुलना केल्यास राज्यातील ७५ टक्के लाभार्थ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
शेतकऱ्यांकडे असलेली जमीन आधार क्रमांकाशी जोडून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी राज्यात ॲग्रिस्टॅक ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातील तलाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना ओळख क्रमांक देत आहेत. या जोडीला आता सामायिक सुविधा केंद्रांमधूनही शेतकरी ओळख क्रमांक करून घेत आहेत. भूमी अभिलेख विभागाने यापुढील टप्प्यात आता थेट शेतकऱ्यांना स्वतःच नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ॲग्रिस्टॅकच्या पोर्टलवरून शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे.
राज्यात या योजनेत आतापर्यंत ९१ लाख ७० हजार ४१८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ९१ लाख ६८ हजार ६३९ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना हा ओळख क्रमांक बंधनकारक केला आहे. त्यानुसार या लाभार्थ्यांची तुलना केल्यास राज्यात आतापर्यंत ७५ टक्के शेतकऱ्यांना हा ओळख क्रमांक दिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक ६ लाख १ हजार १६१ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिले आहेत. या जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे ७ लाख ११ हजार ५५२ लाभार्थी असून ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. लाभार्थ्यांच्या तुलनेत ८४.४९ टक्के जणांना ओळख क्रमांक दिला आहे. त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ९९ हजार २०४ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिले आहेत. पीएम किसान लाभार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ८७.४९ टक्के इतके आहे.
राज्याने ॲग्रिस्टॅक योजनेत ओळख क्रमांक देण्याचा मोठा टप्पा ओलांडला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही ओळख क्रमांक देण्याचे काम वेगाने सुरू आहे. - डॉ. सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक
विभागनिहाय ओळख क्रमांक
पुणे - २१,७१,०९०
नाशिक - १७,८५,४५४
संभाजीनगर - २२,९७,५८२
अमरावती - १२,७७,८९४
नागपूर - ११,३४,०७६
कोकण - ५,०२,२२०
मुंबई - ३२३
एकूण ९१,६८,६३९