राज्यात ९१ टक्के पेरण्या पूर्ण, सोयाबीन वाढले तर कापसाचे क्षेत्र घटले, पावसामुळे भात लावण्यांना वेग
By नितीन चौधरी | Published: July 22, 2024 06:40 PM2024-07-22T18:40:34+5:302024-07-22T18:41:27+5:30
मुसळधार पावसामुळे भात लावण्यांच्या कामांना वेग आला असून राज्यात आतापर्यंत एकूण ९०.७९ टक्के पेरण्या पूर्ण
पुणे: राज्यात गेल्या महिन्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेळेत सुरुवात झाली. मात्र, कोकण आणि पूर्व विदर्भात पुरेसा पाऊस नसल्याने भात लावण्यांना उशीर झाला होता. सध्या पूर्व विदर्भ आणि कोकणात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भात लावण्यांच्या कामांना वेग आला असून राज्यात आतापर्यंत एकूण ९०.७९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र १ कोटी ४२ लाख हेक्टर असून आतापर्यंत १ कोटी २८ लाख ९४ हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ११३ टक्के इतके आहे. राज्यात सर्वाधिक ४८ लाख ५ हजार हेक्टर अर्थात सरासरीच्या ११६ टक्के सोयाबीनच्या पेरण्या झाल्या आहेत. तर कापूस पिकाची ३९ लाख ८४ हजार १२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
यंदा मॉन्सूनने वेळेत हजेरी लावल्यामुळे खरिपातील उडीद, मूग तसेच कापूस व सोयाबीन या महत्त्वाच्या पिकांच्या पेरण्या वेळेत झाल्या. मात्र, कोकण तसेच पूर्व विदर्भात पुरेसा पाऊस न झाल्याने भाताची लावणी वेळेत होऊ शकली नाही. गेल्या पंधरवड्यापासून या दोन्ही विभागांत होत असलेल्या पावसामुळे भाताची ४२ टक्के लावणी पूर्ण झाली आहे. परिणामी राज्यात एकूण १ कोटी २८ लाख ९४ हजार ४४६ हेक्टर अर्थात ९०.७९ टक्क्यांवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षाच्या पेरण्यांच्या तुलनेत हे प्रमाण ११३ टक्के इतके आहे.
राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४१ लाख ४९ हजार ९१२ हेक्टर इतके असून आतापर्यंत ४८ लाख ५ हजार ९९७ अर्थात ११६ टक्के पेरणी झाली आहे. मात्र, कापूस पिकाच्या सरासरी क्षेत्रात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात सरासरी ४२ लाख १ हजार १२८ हेक्टरवर कापसाची पेरणी केली जाते. तर आतापर्यंत ३९ लाख ८४ हजार १२७ हेक्टर अर्थात ९५ टक्के क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे. भाताचे सरासरी क्षेत्र १५ लाख ८ हजार ३७४ हेक्टर असून आतापर्यंत ६ लाख ३१ हजार ८८७ हेक्टर अर्थात ४२ टक्क्यांवर लावणी झाली आहे.
बाजरी पिकाची सरासरी ६ लाख ६९ हजार ८९ हेक्टरवर पेरणी होत असते त्या तुलनेत आतापर्यंत ३ लाख ८० हजार ८४३ अर्थात ५७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर सरासरी तूर लागवड १२ लाख ९५ हजार ५१६ हेक्टर असून आतापर्यंत ११ लाख ६ हजार अर्थात ९० टक्के तुरीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मुगाच्या २ लाख २१ हजार ९६१ हेक्टर अर्थात ५६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा उडीदाच्या पेरण्या ९३ टक्के अर्थात ३ लाख ४४ हजार ६९१ हेक्टर झाल्या आहेत.