यवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 07:42 PM2018-08-14T19:42:01+5:302018-08-14T19:48:40+5:30
यंदाचे साहित्य संमेलन हे विदर्भातच होणार हे जवळपास निश्चित झाले होते. केवळ स्थळावर अद्याप निर्णय झालेला नव्हता.
पुणे : ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळला होणार आहे यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने अखेर मंगळावारी शिक्कामोर्तब केले. स्थळासंदभार्तील अधिकृत घोषणा महामंडळाकडून करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा आणि डॉ. वि.भ कोलते संशोधन केंद्र व वाचनालय यांच्या वतीने हे संमेलन आयोजित केले जाणार आहे.
यंदाचे साहित्य संमेलन हे विदर्भातच होणार हे जवळपास निश्चित झाले होते. केवळ स्थळावर अद्याप निर्णय झालेला नव्हता. ९२ व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा आणि डॉ. वि.भ कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या निमंत्रक संस्थांनी प्रस्ताव दिला होता. महामंडळाच्या संमेलन स्थळ निवड समितीने यवतमाळला भेट देऊन स्थळ व सर्व संबंधित आणि आनुषंगिक बाबींची पाहणी केली. त्यानंतर संमेलन स्थळ निवड समितीच्या बैठकीत या समितीने सवार्नुमते यवतमाळ च्या संमेलन स्थळाची शिफारस महामंडळाला केली होती. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, उपाध्यक्ष डॉ. विद्या देवधर, कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके, कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे या पदाधिका-यांसह मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रतिनिधी डॉ. दादा गोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे विनोद कुळकर्णी आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिनिधी डॉ. अनुपमा उजागरे यांचा या समितीत समावेश आहे. महामंडळाच्या सर्व सदस्यांच्या सहमतीनंतर महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी महामंडळाचा निर्णय मंगळवारी जाहीर केला.
साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शन तसेच संमेलनाचा सविस्तर कार्यक्रम ठरविण्यासाठी महामंडळाच्या ग्रंथ प्रदर्शन समितीची २६ आॅक्टोबरला, संमेलन मार्गदर्शन समितीची २७ आॅक्टोबर आणि महामंडळाची सभा २८ आॅक्टोबरला यवतमाळ येथे आयोजित करण्यात आल्या असल्याचे महामंडळाने सांगितले.