बांधकाम व्यावसायिक डीएसकेंच्या संपत्ती लिलावाबाबत ९३ हरकती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 08:17 PM2020-02-05T20:17:56+5:302020-02-05T20:20:51+5:30
१३ आलिशान गाड्यांचा १५ फेब्रुवारीला लिलाव
पुणे : राज्य शासन आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने जप्त केलेल्या बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढण्याचे आदेश दिले होते. याबरोबरच त्यावर हरकती देखील मागविल्या होत्या. या प्रकरणात ९३ हरकती आल्या आहेत, अशी माहिती आर्थिक व सायरबर गुन्हेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे नातेवाईक यांच्या सुमारे ४६३ स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केल्या आहेत.
ठेवीदारांचे पैसे परत मिळावे म्हणून त्यांची विक्री करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने या संपत्तीची विक्री करण्याबाबत जाहीर नोटीस काढावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. नोटीस काढल्यानंतर संबंधित संपत्तीबाबत कुणाची हरकत असल्यास त्यांनी ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहून आपल्या हरकती नोंदवाव्यात. त्या हरकतींचा निपटारा झाल्यानंतर पुढील कार्यवाही करणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत १ हजार ६५० कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे, ग्राहकांना त्यांचे पैसे लवकर मिळावे यादृष्टीने नोटीस काढल्याने ९३ हरकती व सुचना नोंदविला आहे.
१३ आलिशान गाड्यांचा १५ फेब्रुवारीला लिलाव
डीएसकेंच्या वाहनांचा लिलाव १५ फेब्रुवारीला होणार आहे. त्यांच्याकडे एकूण ४६ वाहने आहेत. त्यापैकी २० वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेल्या वाहनांपैकी १३ आलिशान गाड्यांचा १५ फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे. या वाहनांची किंमत दोन कोटी ५७ लाख ५० हजार रुपये आहे.
चारचाकी वाहन अर्जदाराच्या नावे करण्याची मागणी
अर्जदार करणसिंग परदेशी यांना डीएसकेंकडून १० लाख ३५ हजार रुपये येणे असून त्याबाबत डीएसकेंनी यासंदर्भात अर्जदाराला परतफेडीबाबत धनादेश दिले होते. डीएसकेंकडून मालमत्ता जप्त केली आहे. त्यापूर्वी लिलाव प्रक्रीया पार पडणार आहे. त्या प्रक्रीयेस बराच कालावधी लागू शकतो, अशी शक्यता पाहता अर्जदाराने रक्कम परत मिळावी असा अर्ज दाखल केला आहे. तरी ही रक्कम देण्यास वेळ लागणार असून अर्जदार यांनी डीएसकेंच्या जप्त केलेल्या चार चाकी वाहनांपैकी अर्जदार यांच्या किंमतीचे चारचाकी वाहन आपल्या नावे करावे, अशी मागणी केली आहे.
- अॅड. सुदीप केंजळकर, अर्जदाराचे वकील