आंबेगावातील डिंभे धरणात ९३ टक्के पाणी साठा, सांडव्याद्वारे तब्बल १२ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 11:09 AM2024-08-04T11:09:50+5:302024-08-04T11:10:01+5:30
धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
डिंभे : डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे डिंभे धरणात जलद गतीने पाणी जमा होत आहे. आज धरणात ९३ टक्के पाणी साठा झाला असुन सकाळी ९.४५ वाजता धरणातून संडव्यावरून २५०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत होते त्यात पुन्हा ९ वाजता वाढ करण्यात आली असून डिंभे धरणातून सध्या ९००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. आत पावसाचा जोर वाढत असल्याने सकाळी ११ वाजता ३ हजार क्यूएसकने विसर्ग वाढवून १२ हजार करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्यानेही पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी नागरिकांच्या जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना संबंधित विभागांना दिल्या असून आपत्कालीन परिस्थितीत योग्य त्या कार्यवाही करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.