पुण्यात ९४ वर्षीय याेद्ध्याचे आत्मक्लेश आंदोलन सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 09:14 AM2024-11-30T09:14:22+5:302024-11-30T09:14:45+5:30
राज्यभरातून पाठिंबा : समर्थनार्थ आज प्रत्येक जिल्ह्यात केले जाणार उपोषण
पुणे : हल्ली निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मूल्य उद्ध्वस्त होत असल्याची टीका ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली.
तसेच या प्रकाराचा निषेध म्हणून ९४ वर्षीय याेद्धा अर्थात डाॅ. बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेश आंदाेलन पुकारले आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही हे आंदाेलन सुरूच होते. या आंदोलनाला राज्यातून पाठिंबा मिळत असून, डॉ. आढाव यांच्या समर्थनार्थ शनिवारी राज्यातील जिल्ह्यांमध्येही असेच आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी सकाळी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेणार आहेत. शुक्रवारी सायंकाळीच ते भेटणार होते. मात्र, त्यांना परगावाहून येण्यास उशीर झाल्यामुळे ही भेट शनिवारी ठरविली आहे.
डॉ. आढाव यांच्याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार, गोरख मेंगडे यांनीही आपले उपोषण सुरू ठेवले आहे. ३० नोव्हेंबरला (शनिवारी) उपोषण थांबवणार असल्याचे डॉ. आढाव यांनी जाहीर केले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी डॉ. आढाव यांनी सुरू केलेल्या या उपोषणामुळे कामगार चळवळीतील त्यांचे सहकारी चिंतित असून, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात आहे.
महात्मा गांधी भवनचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, माजी मंत्री, आमदार डाॅ. विश्वजीत कदम, ज्येष्ठ नेते मोहन जोशी, रमेश बागवे, किरण मोघे, मेधा थत्ते, भाई संपतराव पवार, धनाजी गुरव व अन्य स्थानिक पदाधिकारी, नेते यांनी शुक्रवारी उपोषणस्थळी येऊन डॉ. आढाव यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार ती पाळत नसेल तर नागरिकांना त्याविरोधात आवाज उठविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळेच हे आत्मक्लेश आंदोलन आहे.
- डाॅ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते