जिल्ह्यात ९४ हजार सुपरस्प्रेडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:11 AM2021-05-07T04:11:16+5:302021-05-07T04:11:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर कमी असला तरी वाढती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर कमी असला तरी वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. ही वाढ रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे तालुकानिहाय सुपरस्प्रेडर आणि सर्वाधिक जनसंपर्क असणाऱ्या २ लाख ६८ हजार ३३४ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात जिल्ह्यात ९४ हजार ६६९ सुपरस्प्रेडर असल्याचे आढळले. यापैकी तपासणी करण्यात आलेल्या ४३ हजार २२१ पैकी ६ हजार ७२८ नागरिक कोरोनाबाधित आढळले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पासनरे यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोना आढावासंदर्भात त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तर उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तिडके उपस्थित होते. पानसरे म्हणाल्या, जिल्ह्यातील कोरोना प्रसाराचा वेग थांबवण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना राबवीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे सुपरस्प्रेडर नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करून कोरोनाबाधितांचा शाेध घेणे हा आहे. मार्च महिन्यापासून २ लाख ६८ हजार ३३४ जणांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले. त्यातील ९४ हजार ६६९ नागरिक सुपरस्प्रेडर असल्याचे आढळले. यापैकी ३७ हजार ९४२ जणांना कोरोनाची लक्षणे आढळली. यामुळे आरोग्य विभागामार्फत अशा ४३ हजार २२१ जणांच्या अनुक्रमे अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ६ हजार ७२८ नागरिक हे कोरोनाबाधित आढळले आहेत.
या कोरोनाबाधितांवर कोविड केअर सेंटर तसेच इतर रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. वाढती कोरोनासंख्या लक्षात घेता हे सर्वेक्षण सुरूच ठेवण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यात लसीकरण मोहीमही वेगवान करण्यात आली आहे. जिल्ह्याला मंगळवारी ५५ हजार लसींचे डोस मिळाले. त्यातून जिल्ह्यातील २८ लसीकरण केंद्रांवर संध्या लसीकरण मोहीम सुरु आहे. लस ज्या प्रमाणात उपलब्ध होतील त्या प्रमाणात जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रे येत्या काळात सुरू करण्याचा प्रयत्न राहील, असे आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी सांगितले. जिल्ह्यात ३६७ शासकीय तर ४४१ खासगी असे एकूण ४०८ लसीकरण केंद्रे असल्याची माहिती उपजिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. तिडके यांनी दिली.
चौकट
जुन्नर, हवेली तालुक्यांत सर्वाधिक सुपरस्प्रेडर
जिल्ह्यात जुन्नर आणि हवेली तालुक्यांत सर्वाधिक सुपरस्प्रेडर आहेत. जुन्नरमध्ये २६ हजार ८५८ नागरिक सुपरस्प्रेडर आहेत. त्यातील १३ हजार ६० जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. यात २ हजार ६१६ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले. तर हवेली तालुक्यातील १३ हजार ९३९ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १ हजार ८१ जणांच्या स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी ११४ जण हे कोरोनाबाधित आढळले.