क्रेडिट कार्डच्या नावाखाली महिलेला साडेनऊ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: January 5, 2024 03:06 PM2024-01-05T15:06:38+5:302024-01-05T15:07:51+5:30
चंदननगर पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांकधारकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
पुणे : बँकेतून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्याने खराडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडला आहे.
या प्रकरणी खराडी परिसरात राहणाऱ्या एका ३९ वर्षीय महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. ‘क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट मधून बोलत आहे. तुमचा क्रेडिट कार्ड प्रोटेक्शन प्लॅन वापरात नसल्याने वार्षिक फी वाढत आहे. तुम्ही आमचे जुने कस्टमर असून तुमचे कार्ड अपडेट करत आहोत असे सांगितले. त्यानंतर एक लिंक पाठवून अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. क्रेडिट कार्डची खासगी माहिती घेतली. फिर्यादींनी त्यांच्या मोबाइलवर आलेला ओटीपी सांगताच त्यांच्या खात्यातून ९ लाख ५५ हजार रुपये वेगवगेळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांकधारकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनीषा पाटील करत आहेत.