विसर्जनाला २६ तासांत मिनी हॉस्पिटलमध्ये ९५० जणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 19:14 IST2018-09-25T18:53:12+5:302018-09-25T19:14:38+5:30
गणेशोत्सवात सलग अकरा दिवस सुरु असलेल्या हॉस्पिटलमध्ये तब्बल २२५३ जणांची तपासणी करुन त्यांना मोफत औषधे व वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे.

विसर्जनाला २६ तासांत मिनी हॉस्पिटलमध्ये ९५० जणांची तपासणी
पुणे : उच्च रक्तदाब, सांधेदुखी, अंगदुखीसारख्या तक्रारी घेऊन गणेश विसर्जनाच्या दिवशी मिनी हॉस्पिटलमध्ये आलेल्या सुमारे ९५० पोलीस आणि गणेशभक्तांची मोफत तपासणी करण्यात आली. रविवारी सकाळी १० वाजल्यापासून ते सोमवारी दुपारी मिरवणूक संपेपर्यंत अखंड २६ तास कार्यरत असलेल्या मिनी हॉस्पिटलमध्ये रक्तदाब, मधुमेह, ताप, अंगदुखी, छातीत दुखणे, खरचटणे, गुदमरणे आदी तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. गणेशोत्सवात सलग अकरा दिवस सुरु असलेल्या हॉस्पिटलमध्ये तब्बल २२५३ जणांची तपासणी करुन त्यांना मोफत औषधे व वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे.
निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात मिनी हॉस्पिटल उभारण्यात आले. डॉ. सुजाता बरगाले, डॉ. यु. के. आंबेगावकर, डॉ. मनिषा दणाणे, डॉ. अनिल शर्मा, संजीवन हॉस्पिटलचे २२ डॉक्टर्स यांसह संस्थेचे आनंद भट्टड, स्वप्निल देवळे, गिरीराज लढ्ढा यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाकरिता पुढाकार घेतला. पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन झाले होते. पोलिसांसह गणेशभक्तांना त्वरीत उपचार मिळावेत, याकरीता मिनी हॉस्पिटलमध्ये ५ बेड आणि सर्व प्रकारची औषधे, इंजेक्शन, सलाईन उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच आपत्कालीन परिस्थितीकरीता २० हून अधिक डॉक्टरांची टीम आणि रुग्णवाहिका सज्ज होती.
बेलबाग चौकात गर्दीमध्ये जखमी झालेल्या सीमा जगताप या युवतीला कपाळावर जखम होऊन रक्त वाहू लागल्याने त्वरीत मिनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर, रंजना देवकर या ४० वर्षाच्या महिला गर्दीमध्ये जीव गुदरमल्याने सिटी पोस्ट चौकात चक्कर येऊन पडल्या. त्यांना देखील पोलिसांनी मिनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले. याशिवाय दमा, मधुमेह व रक्तदाबाने अनेकजण त्रस्त असल्याचेही उपचारादरम्यान दिसून आले.
विसर्जनादरम्यान ३३ जणांना सलाईन लावण्यात आले. तर १०० जणांना इंजेक्शन, ७ जणांना आॅक्सिजन, १३ लोकांना वाफेद्वारे उपचार देण्यात आले. तसेच पित्तावरील औषधे, वेदनाशामक गोळ्या, मलम देऊन अंगदुखी व इतर तक्रारी दूर करण्यात आल्याचे अध्यक्ष जयेश कासट यांनी सांगितले. पोलीस व गणेशभक्तांच्या आरोग्यविषयक समस्या त्वरीत सोडवून मोफत औषधे दिली जात असल्याने गणेशोत्सवातील बंदोबस्तासाठी आम्ही सक्षम राहिलो, अशी भावना पोलिसांनी व्यक्त केली. या उपक्रमाबाबत पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी संस्थेचे कौतूक केले.
...................
जनहितम संघटनेतर्फे पोलिसांसाठी सकस आहार
गणेशोत्सवामध्ये ३६ तासांपेक्षा अधिक काळ खडा पहारा देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता जनहितम संघटना व अखिल बिबवेवाडी वारकरी सेवा संघाच्यावतीने सकस आहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाचे उद्घाटन वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे, प्रभाकर ढमाले, स्वारगेट पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक कदम, निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पंडीत, निरीक्षक (वाहतूक) नलावडे, संघटनेचे अध्यक्ष रामविलास माहेश्वरी, ॠषीकेश जोशी, निमा गांधी, बद्री झंवर आदी उपस्थित होते.
स्वारगेट चौकामध्ये तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. गणेशोत्सवाच्या शेवटच्या सलग पाच दिवस पोलिसांसाठी पाणी, चहा व बिस्कीटांची व्यवस्था करण्यात आलेली होती. जवळ पासच्या सात पोलीस ठाण्यांसह वाहतूक शाखांना फूड पॅकेट्स पोहचविण्यात आले.