पुणे जिल्ह्यात कंत्राटी स्वरूपातील ९६ रुग्णवाहिकाचालक ५ महिने बिनपगारी; कुटुंबावर उपासमारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:03 PM2023-08-31T13:03:53+5:302023-08-31T13:04:09+5:30
राज्य शासनाकडून पैसे न आल्यामुळे रुग्णवाहिका चालकांचे वेतन थांबले, आरोग्य अधिकाऱ्याची प्रतिक्रिया
भोर : जिल्हा आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या ९६ रुग्णवाहिका वाहन चालकांचे पाच महिन्यांपासून पगार थकीत आहे.त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत आरोग्य विभागाकडे सतत पाठपुरावा करूनही अजून पर्यंत वेतन मिळालेले नाही. वाहन चालक असोसिएशन व शासनाचे दुर्लक्षामुळे रुग्णवाहिका वाहन चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात चालकांची शारदा सर्व्हिसेस पुणे वाहनचालक असोसिएशनच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने नेमणूक केलेली आहे. सदर काम करणारे वाहन चालक २४ तास आरो सेवा देत आहे. यात प्रसूती (डिलिव्हरी) सर्प दंश झालेले रुग्ण हृदयविकाराचा झटका आलेले, अपघात झालेले अपघातात मृत्यूची पडलेले याशिवाय अति तत्काळ आरोग्यसेवा दुर्गम डोंगरी भागात जाऊन काम केले जात आहे. रात्री अपरात्री सेवा द्यावी लागते.
भोर तालुक्यातील हिर्डोशी आंबवडे नसरापूर, भोंगवली, जोगवडी या पाच ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाच रुग्णवहिका असून पाच वाहन चालक कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत ९६ रुग्णवाहिका वाहन चालकांची अवस्था बिकट होत चालली आहे. अल्पशा वेतनावर ते कार्यरत आहेत. अशावेळी उदरनिर्वाह करावा तरी कसा? असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे गत पाच महिन्यांपासून त्यांचे वेतन झालेले नाही. वेतन वेळेवर न होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. अन्य राज्यांप्रमाणे आम्हालाही सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी त्यांची मागणी आहे. मात्र जिल्हा आरोग्य विभाग त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते.
अनेकवेळा शासनाकडे निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला. आरोग्य विभागात कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी त्यांनी वारंवार केली. मात्र त्याकडेही शासनाने लक्ष दिलेले नाही पाच महिन्यांचे थकीत वेतन देण्यात यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र पाच महिने पगार नसल्यामुळे सदर वाहन चालक यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
''राज्य शासनाकडून पैसे न आल्यामुळे रुग्णवाहिका चालकांचे वेतन थांबले आहे. सुरुवातीचे एक दोन महिने वेतन दिले आहे. उर्वरित वेतन जिल्हा परिषदेच्या स्व निधीतून देण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठी येत्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मांडण्यात येणार असून लवकरच चालकांचा वेतन प्रश्न मार्गी लागेल.डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पुणे.''