नारायणगावला ९६ बनावट पीठ गिरण्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:53+5:302021-07-16T04:09:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नारायणगाव : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शेतकरी मशीनरी दुकानावर पोलिसांनी छापा टाकून कोहिनूर या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शेतकरी मशीनरी दुकानावर पोलिसांनी छापा टाकून कोहिनूर या बनावट नावाने पीठ गिरण्यांची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून ८ लाख १६ हजार रूपयांच्या ९६ पिठगिरण्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई बुधवारी (दि १४) रात्री करण्यात आली.
सुधीर प्रकाश गडाख (वय ३७ रा.संगमनेर जि.अहमदनगर) यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद विनोद सेल्स कॉर्पोरेशनचे संचालक पराग अशोककुमार शहा यांनी दिली. यापूर्वी ७ जुलै रोजी बनावट पीठ गिरण्या सील करण्याची पहिली कारवाई नारायणगाव (वारूळवाडी) येथील गडाख मशीनरी यांच्या दुकानावर छापा टाकून करण्यात आली होती. त्यावेळी १४ लाख ९७ हजार ५०० किमतीच्या १७५ बनावट गिरण जप्त करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करतांना याच प्रकारे बनावट गिरण्या अकोले येथील सुधीर गडाख यांच्या मालकीचे शेतकरी मशीनरी येथे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि १४) रात्री या दुकानावर छापा टाकून ८ लाख १६ हजार किमतीच्या ९६ बनावट चक्क्या जप्त करण्यात आल्या. या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की कोहिनूर नावाच्या बनावट आटा चक्क्या कोणी विक्री करत असेल तर त्यांनी नारायणगाव पोलिसांशी संपर्क साधावा.