महापालिकेत ९६ नवीन चेहरे
By admin | Published: February 25, 2017 02:31 AM2017-02-25T02:31:18+5:302017-02-25T02:31:18+5:30
अनेक दिग्गज सभासदांची परंपरा असलेल्या पुणे महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहामध्ये १६२ पैकी ९६ जण पहिल्यांदाच निवडून आले आहेत
पुणे : अनेक दिग्गज सभासदांची परंपरा असलेल्या पुणे महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहामध्ये १६२ पैकी ९६ जण पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे सभागृहामध्ये नवीन चेहऱ्यांची संख्या लक्षणीय असणार असून, त्यांच्या समवेत निवडून आलेल्या ६६ सिनिअर सभासदांचे मार्गदर्शन त्यांना मिळू शकणार आहे. नवीन सभादांची संख्या खूपच मोठी असल्याने त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन सर्वच राजकीय पक्षांसह महापालिका प्रशासनाला करावे लागणार आहेत.
महापालिकेच्या सभागृहाचे कामकाज मुंबई महापालिका अधिनियमानुसार पार पाडले जाते. प्रत्येक महिन्याला किमान एक मुख्य सभा घेण्याचे बंधन प्रशासनावर आहे. या मुख्य सभेमध्ये शहराच्या विकासाशी संबंधित कामांना मंजुरी देणे, प्रभागातील नागरिकांच्या समस्या मांडण्याचे काम नगरसेवकांकडून केले जाते. लेखी प्रश्नोत्तर, ऐनवेळी उपस्थित केले जाणारे प्रश्न, तहकुबीचा प्रस्ताव, हरकत नोंदविणे आदी मार्गांनी नगरसेवकांना आपला सहभाग सभागृहात नोंदविता येतो. सभागृहात सक्रिय राहून अनेक प्रश्न मार्गी लावता येऊ शकतात. मात्र, त्यासाठी सभागृहाच्या कामकाजाची सविस्तर माहिती सभासदांना असणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांना याबाबतचे योग्य प्रशिक्षण प्रशासनाला द्यावे लागणार आहे. नगरसेवकांना वॉर्डस्तरीय निधी व अंदाजपत्रकातील प्रभागाचा निधी या आधारे विकासकामे पार पाडता येतात. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडे प्रस्ताव कसा दाखल करायचा, तेथून २२ टेबलांवरून होणारा प्रस्तावाच्या फाइलींचा प्रवास योग्य वेळेत व्हावा यासाठी करावा पाठपुरावा याची माहिती नगरसेवकांनी करून घेणे आवश्यक आहे. याबाबतची नीटशी माहिती न मिळाल्यामुळे नव्याने नगरसेवक झालेल्या अनेकांचे पहिले वर्ष-सहा महिने असेच निघून जातात. त्यामुळे याचीही माहिती सभासदांना देणे आवश्यक आहे.
प्रशासनाबरोबर नवीन सभासदांना प्रशिक्षण देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या राजकीय पक्षांवर असणार आहे. भाजपाकडून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये सभासदांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. इतर पक्षांनीही यासाठी पुढाकार घेऊन नवीन नगरसेवकांना कामकाजाची माहिती देणे आवश्यक असणार आहे.