गुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्‍या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:28 PM2021-05-17T22:28:32+5:302021-05-17T22:28:43+5:30

पुणे पोलिसांच्या १५ पथकांनी रात्रीचा दिवस एक करुन तब्बल ९६ जणांना शोधून अटक केली.

96 person sent to Yerawada Jail; The biggest action of the Corona period | गुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्‍या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई 

गुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्‍या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई 

googlenewsNext
ठळक मुद्देरात्रीचा दिवस करुन केली सर्वांची वैद्यकीय तपासणी

पुणे : माधव हनुमंत वाघाटे याच्या खुनानंतर त्याच्या पार्थिवाची शेकडोंच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे पोलिसांना आव्हान दिल्यावर काय होते, याचा प्रत्यय या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांना आला. 

पुणेपोलिसांच्या १५ पथकांनी रात्रीचा दिवस एक करुन तब्बल ९६ जणांना शोधून अटक केली. ४० हून अधिक गाड्या जप्त केल्या. मोठा पोलीस फौजफाटा घेऊन या सर्वांची ससून रुग्णालय, गंगाधाम व धनकवडीतील सेंटरवर रॅपिट टेस्ट करण्यात आली. सुदैवाने त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यानंतर या सर्वांना न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे येरवडा कारागृहात दाखल करण्यापूर्वी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट उद्या येणार आहे. कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर एकाच गुन्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोपींना अटक करुन त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायालयापुढे हजर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कोरोनाचा संसर्ग आणि त्याबाबत घ्यावयाची दक्षता यामुळे सध्या आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मोठे परिश्रम करावे लागत असतात. 

माधव वाघाटे याचा बिबवेवाडी पोलीस चौकीच्या समोर १० जणांनी खुन केला. त्यानंतर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुमारे २० जणांनी त्याची अंत्ययात्रा काढली होती. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांवर चौफर टिका होऊ लागली. आम्ही बाहेर पडलो तर लगेज ५०० रुपये दंड आकारतात, मग अशावेळी पोलीस कोठे गेले होते, अशी विचारणा सोशल मिडियावर होऊ लागली. याची दखल घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गुन्हे शाखेतील १५ पथके, परिमंडळ २, सहकारनगर, भारती विद्यापीठ व इतर पोलीस ठाण्यातील पोलिसांची मदत घेण्यात आली. त्यासाठी १५ पोलीस पथकांची स्थापना करण्यात आली. या पथकांनी धनकवडी ते कात्रज स्मशानभूमी या संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्हींची तपासणी केली. त्यातून दुचाकी, कार व रिक्षा यांचे नंबर घेऊन तसेच गाड्यांवरील आरोपींचे पडताळणी करुन त्यांना ताब्यात घेण्याचा सपाटा लावण्यात आला़ रविवारी संपूर्ण दिवसभर ही कारवाई करण्यात आली़ सायंकाळपर्यंत ८० जणांना अटक करण्यात आली़ इतक्या मोठ्या प्रमाणावर अटक केलेल्या लोकांना कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांची वैद्यकीय तपासणी, रॅपिड टेस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्याची आवश्यकता होती़ त्यासाठी राखीव पोलीस फौजफाटा गाड्या मागविण्यात आल्या. जवळच्या पोलीस ठाण्यातील पोलिसांची मदत घेण्यात आली.

शहरातील वेगवेगळ्या चाचणी केंद्रावर या आरोपींना बंदोबस्तात नेण्यात आले. रात्रभर या सर्व आरोपींची टेस्ट करण्यात आली. त्यानंतर मोठ्या बंदोबस्तात त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोनाची चाचणी करण्यात येऊन कारागृहात रवानी करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेतील १५ पथके, परिमंडळ २ आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी रात्रभर जागून ही कारवाई पूर्ण केली. सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. खेंगरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 96 person sent to Yerawada Jail; The biggest action of the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.